लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने लकडगंजमधील फ्री ऑक्ट्रॉय झोनमध्ये छापा घालून ६८ लाखांची सुपारी तसेच प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि गुटखा जप्त केला. या कारवाईमुळे सुपारी व्यापाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे.
लकडगंजमधील अनेक व्यापारी प्रतिबंधित गुटखा आणि सडक्या सुपारीच्या धंद्यात रोज लाखोंचे वारे न्यारे करतात. बंदी असूनही अनेकांच्या गोदामात कोट्यवधींचा माल रोज काढला, ठेवला जातो. क्वेट्टा कॉलनीतील नीरज सतीश बुधराज (वय ३८) नामक व्यापाऱ्याच्या गाळे क्रमांक ७८-१ मध्ये असाच सुगंधित तंबाखू साठवून ठेवल्याची माहिती कळाल्यामुळे गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने तेथे शनिवारी दुपारी छापा घातला यावेळी नीरज बुधराजच्या गोदामात पोलिसांना मजा-१०८ तंबाखूचे ७ बॉक्स (किंमत ५६ हजार) आढळले. त्यानंतर याच पथकाने रंजित गाैतमचंद बोथरा (वय ४४, रा. संघ बिल्डींग, जामदार शाळेजवळ, लकडगंज) नामक व्यापाऱ्याच्या १२४-१ क्रमांकाच्या गाळ्यात छापा घातला असता तेथे पोलिसांना लाल रंगाच्या सुपारीची तब्बल ५३१ पोती आढळली. या सुपारीची किंमत ६७ लाख, ६८ हजार, ५२० रुपये आहे. पोलीस निरीक्षक जी. के. कल्याणकर, विनोद चाैधरी, सहायक निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, उपनिरीक्षक हेमंत थोरात, हवालदार शंकर शुक्ला, आनंद काळे, नंदकिशोर शिंदे, ईश्वर कोरडे, विनोद सोनटक्के, अभिषेक हरदास, संतोष गुप्ता, अमोल जासूद, मृदुल नगरे, विकास पाठक, आशिष पवार,शाम कडू, अनुप तायवाडे आदींनी अन्न व सुरक्षा विभागाचे अधिकारी प्रफुल्ल टोपले यांच्या मदतीने केली.
----
सुपारी व्यापाऱ्यांमध्ये धावपळ
या कारवाईमुळे बोथरा आणि बुधराजसह अनेक सुपारी व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड धावपळ निर्माण झाली. सूत्रांच्या माहितीनुसार नीरज बुधराजला नागपुरातील गुटखा किंग म्हटले जाते. बोथरा आणि बुधराज सलीम चुनावालासह अनेकांच्या संपर्कात असून ते दुधाच्या तसेच केरोसिनच्या वाहनातून गुटख्याची तस्करी करतात. मध्यभारतात त्यांचे मोठे नेटवर्क असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, या कारवाईमुळे अनेकांनी आपापल्या गोदामाला कुलूप लावून पलायन केले. तर काहींनी आपला मालही हलविला. काहींनी आपल्याकडे कारवाई होते का, याचा अंदाज घेण्यासाठी पोलिसांच्या संपर्कात असणाऱ्या
दलालांना कामी लावले होते.