नागपूर : विदर्भसाहित्य संघाचे ६८वे साहित्य संमेलन गोंडवन शाखेच्या वतीने २५ ते २७ मार्चदरम्यान चंद्रपूर येथील प्रियदर्शनी सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
तीन दिवस चालणाऱ्या साहित्य संमेलनात एकूण १३ सत्रे होणार असून, त्यात दोन दिवस कविसंमेलने, कथाकथन, लेखक तुमच्या भेटीला, प्रकट मुलाखत, अभिरूप न्यायालय आदी कार्यक्रमांसोबतच ‘पर्यावरण, अरण्ये आणि कृषिसंस्कृती : आजचे प्रश्न’, ‘मराठी साहित्यातील स्त्रीवाद आज शिल्लक आहे काय’, ‘मराठी साहित्यातील विविधप्रवाही साहित्यधारा’ आणि ‘संत साहित्य आणि वर्तमान समाजभान’ या विषयांवरील परिसंवादाचे आयोजनही करण्यात आले आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विदर्भातील जुने-नवे असे एकूण शंभराच्या वर लेखक-कवी सहभागी होणार आहेत. गोंडवन शाखेचे अध्यक्ष डॉ. शरच्चंद्र सालफळे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या चंद्रपूर येथील सभेत ही माहिती देण्यात आली. यावेळी विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, सरचिटणीस विलास मानेकर, शाखा समन्वय समितीचे प्रमुख प्रदीप दाते, डॉ. श्याम मोहरकर, इरफान शेख, श्याम हेडाऊ, गोपाल शिरपूरकर, प्रा. श्याम धोटे, मो.बा. देशपांडे, प्रा. नरेंद्र टिकले, श्रीकांत साव उपस्थित होते.