ऑनलाईन लोकमत नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६९ हजार ३०९ शेतकरी खातेदारांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी योजनेमुळे नवीन पीक कर्ज घेणे आता सुलभ झाले आहे. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या कर्जमाफीमुळे मोठा दिलासा मिळाला असून कर्जमाफी झाल्याचे संदेश मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.काटोल येथील योगेश कृष्णाजी रेवतकर यांनी चार एकर शेती पिकविण्यासाठी ६५ हजार रुपयाचे पीककर्ज घेतले होते. कर्ज थकीत झाल्यामुळे व्याजासह ८८ हजार रुपयाचे कर्ज या कर्जमाफी योजनेमुळे माफ झाले आहे. शासनाने अत्यंत पारदर्शकपणे कर्जमाफीची योजना राबविली असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेले कर्ज व्याजासह माफ झाले असल्याचा एसएमएस मिळाल्यामुळे मी आता कर्जमुक्त झालो आहे. त्यामुळे मला नवीन कर्ज मिळणार आहे.रेवराळ येथील इंदोरा सेवा सहकारी संस्था शाखेतून शंकुतला लेनीया यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. कर्ज थकीत झाल्यामुळे व्याजासह १ लाख ४० हजार ७६६ रुपयाचे कर्ज माफ झाले असून कर्ज माफ झाल्याचा संदेश एसएमएसवर मिळाला आहे. कर्जमुक्त झाल्यामुळे नव्याने कर्ज मिळण्यासाठी पात्र झाल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला.कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला असता कळमेश्वर तालुक्यातील रिधी पिपळा येथील महिला शेतकरी यांनी पीक कर्जासाठी २५ हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. त्यांचे कर्ज व्याजासह माफ झाले आहे. तसेच कामठी तालुक्यातील दिघोरी, महालगाव येथील दोन एकर शेती असलेले सागर किशोरसिंग बैस यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून ३८ हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. व्याजासह हे कर्ज ५४ हजार ८७७ रुपयाचे झाले होते. शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यामुळे व्याजासह माझे कर्ज माफ झाले आहे. अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. मौदा तालुक्यातील आष्टी येथील पद्माकर श्यामजी ढोक यांचे ७५ हजार ८८२ रुपयाचे कर्ज व्याजासह माफ झाले आहे.नागपूर तालुक्यातील लोढी पांजरी येथील उदयशंकर भगवतजी ठाकूर यांनी घेतलेल्या १ लाख रुपये मूळ कर्ज व व्याजासह १ लाख ४४ हजार २२५ रुपयाचे कर्ज माफ झाल्याचा एसएमएस संदेश जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.१९ हजार कोटी रुपयाची रक्कम बँकेकडे वर्गछत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजने अंतर्गत आतापर्यंत राज्यातील सुमारे ४१ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १९ हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील ग्रीन यादीमधील ६९ हजार ३०९ कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. यापैकी ४४ हजार २७० शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. तसेच १३ हजार ४६१ वन टाईम सेटलमेंटचा लाभ मिळणार आहे. तर ११ हजार ५७८ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या खातेदारांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येत आहे. जे शेतकरी कर्ज माफीसाठी पात्र होते परंतु त्यांनी अर्ज केला नाही अशा शेतकऱ्यांना योजनेत सामावून घेण्यात येणार असून शेवटच्या पात्र शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे.कर्जमाफीची रक्कम जमा करण्यासाठी २७७ कोटी ९७ लाख ७१ हजार रुपयाची रक्कम प्राप्त झाली असून जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जमाफी योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्याला सुरुवात केली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुमारे २० हजार ८७४ शेतकरी खातेदारांचा समावेश असून त्यांना १४१ कोटी ९३ लक्ष २७७ हजार रुपयाची रक्कम प्राप्त झाली आहे. कर्जमाफीची ही प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे.
कर्जमाफीचा ६९ हजार ३०९ शेतकऱ्यांना मिळणार लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:51 AM
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६९ हजार ३०९ शेतकरी खातेदारांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी योजनेमुळे नवीन पीक कर्ज घेणे आता सुलभ झाले आहे.
ठळक मुद्देकर्जमाफीमुळे पीक कर्ज मिळणार