लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : खरीप हंगाम तोंडावर असून, हंगामपूर्व मशागतीची कामे व खते, बी-बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. अशात बँकांनीसुद्धा पीककर्ज वितरण सुरू केले आहे. आतापर्यंत १२ बँकांनी तालुक्यातील ६९१ शेतकऱ्यांना ५ कोटी ६५ लाख रुपये पीककर्ज वितरित केले आहे.
तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी पीककर्ज वितरणसंदर्भात आवश्यक त्या सूचना बँक व्यवस्थापकांना दिल्या आहेत. पीककर्ज वितरण करताना शेतकऱ्यांना त्रास हाेणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी संबंधित बँकांना केले आहे. १ एप्रिलपासून बँकांनी खरीप पीककर्ज वितरणास सुरुवात केली. त्यानुसार १७ मेपर्यंत स्टेट बँक ऑफ इंडिया, भिवापूर शाखेने २१ शेतकऱ्यांना १८ लाख ११ हजार रुपये, बँक ऑफ इंडिया भिवापूर- १२१ शेतकऱ्यांना ९८ लाख ८५ हजार रुपये, बँक ऑफ महाराष्ट्र नांद- १७७ शेतकऱ्यांना ९५ लाख रुपये, बँक ऑफ इंडिया कारगाव- ७६ शेतकऱ्यांना ६७ लाख ६५ हजार रुपये, युको बँक सिर्सी- ९० शेतकऱ्यांना १ कोटी १५ लाख रुपये, बँक ऑफ महाराष्ट्र उमरेड- ७५ शेतकऱ्यांना ७८ लाख रुपये, युनियन बँक उमरेड- ३५ शेतकऱ्यांना ५५ लाख रुपये, आयडीबीआय बँक बेसूर- ३९ शेतकऱ्यांना ६१ लाख ६७ हजार रुपये या राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भिवापूर शाखेने आठ सहकारी संस्था मिळून ५० शेतकऱ्यांना ५७ लाख ८५ हजार रुपये, तर याच बँकेच्या नांद शाखेने सात शेतकऱ्यांना ८ लाख ८७ हजार रुपये पीककर्ज दिले आहे. एकूण १२ बँकांपैकी १० बँकांनी आतापर्यंत ६९१ शेतकऱ्यांना ५ कोटी ६५ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले, अशी माहिती सहायक निबंधक नरेश खोब्रागडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
...
कर्ज वितरणात दोन शाखा निरंक
तालुक्यात १२ बँकांमार्फत खरीप पीककर्जाचे वितरण करण्यात येत आहे. त्यापैकी १० बँकांनी पीककर्ज वितरणास सुरुवात केली. मात्र, आयसीआयसीआय बँकेच्या जवळी व महालगाव शाखांतून अद्याप एकाही शेतकऱ्याला पीककर्ज मिळालेले नाही. या शाखा पीककर्ज वितरणासाठी मुहूर्त शोधत आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे. पीककर्ज वितरणात सध्या बँक ऑफ महाराष्ट्र, नांद शाखा प्रथम क्रमांकावर, तर त्यापाठोपाठ बँक ऑफ इंडिया, भिवापूर दुसऱ्यास्थानी आहे.
....
तालुक्यात खरीप पीककर्ज वितरण सुरू झाले आहे. बँकांकडून शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळावे. त्यांना कुठलाही त्रास होऊ नये. याबाबत आवश्यक त्या सूचना बँक व्यवस्थापन व संबंधितांना दिल्या आहेत. येत्या काही दिवसांत पीककर्ज वितरणाचा वेग वाढेल. त्या अनुषंगाने सोमवारी बैठकही बाेलावली आहे.
-अनिरुद्ध कांबळे, तहसीलदार, भिवापूर