लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) विशेष मोहिमेंतर्गत मस्कासाथ, इतवारी, राणी दुर्गावती चौक, वाडी येथील महालक्ष्मी ट्रेडर्स, प्रीतम ट्रेडिंग कंपनी, चांदुमल भगवानदास, सुपारीवाला सेल्स कॉर्पोरेशन आणि आसुमल लिलराम या प्रतिष्ठानांकडून ७ लाख १८ हजार २७४ रुपये किमतीचा भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा जप्त केला.
सणासुदीच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल, रवा, मैदा, वनस्पती व बेसन या अन्नपदार्थांचा मिठाई, नमकीन बनविण्यासाठी उपयोग होतो. जनतेला स्वच्छ व आरोग्यदायी अन्न मिळविण्याकरिता अन्न व औषध प्रशासन नागपूर येथील सहायक आयुक्त (अन्न) शरद कोलते यांच्या नेतृत्त्वात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. उपरोक्त प्रतिष्ठानांमध्ये टिनाच्या डब्यांचा पुनर्वापर व भेसळीच्या संशयावरून शेंगदाणा तेल (केएमसी स्पेशल) या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. या प्रतिष्ठानातून फिल्टर शेंगदाणा तेल (केएमसी स्पेशल) ७ लाख १८ हजार २७४ रुपये किमतीचा ४७७७.२८ किलो तेलाचा साठा जप्त केला. या साठ्यातून प्रत्येकी एक-एक नमुना विश्लेषणासाठी घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. नमुन्याचा विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
कारवाई अन्न व औषध प्रशासन नागपूर येथील सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (अन्न) शरद कोलते यांच्या नेतृत्त्वाखाली नागपूर कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी विनोद धवड, अनंत चौधरी, अमितकुमार उपलप, ललित सोयाम, महेश चहांदे आणि अखिलेश राऊत यांनी केली. पुढील काळात सणासुदीच्या दिवसांचा विचार करता खाद्यपदार्थांमध्ये भेसळीची शक्यता जास्त असल्याने अन्न व औषध प्रशासन नागपूरतर्फे धडक मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. ग्राहकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत काही तक्रार असल्यास विभागाकडे तक्रार देता येणार आहे.