लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :वाघांच्या अवयवांच्या तस्करीत गुंतलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील आरोपींचा मागील महिन्यात छडा लावल्यावर आता, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील आरोपीही वन विभागाच्या हाती लागले आहेत. रविवारी केलेल्या कारवाईत ७ आरोपींना अवयवांसह अटक करण्यात आल्याने तस्करी आणि शिकार प्रकरणात नवी दिशा गवसण्याची शक्यता आहे.
नागपूर-वर्धा महामार्गावरील हळदगाव टोलनाक्यावर वन विभागाच्या बुटीबोरी पथकाने ही कारवाई केली. एका चारचाकी वाहनातून काही व्यक्ती वाघाचे अवयव नागपूरकडे विक्रीसाठी आणत असल्याची माहिती वन विभागाच्या पथकाला मिळाली. यावरून टोलनाक्यावर सापळा रचण्यात आला होता. (एमएच ४४- बी ५१५२) या क्रमांकाचे वाहन येताच पथकाने ते थांबविले आणि अवयवांसह सर्वांना ताब्यात घेतले. नागपुरातील ग्राहकाला या अवयवांची विक्री केली जाणार होती. चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले आहे. यात पुन्हा काही आरोपी असल्याची शंका वन विभागाला आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रकाश महादेव कोळी (कामतदेव, ता. नेर, यवतमाळ), प्रकाश रामदास राऊत (वरुड, ता. बाभुळगाव, यवतमाळ), संदीप महादेव रंगारी (वर्धा), अंकुश बाबाराव नाईकवाडे (ईचोली, ता. यवतमाळ), विनोद श्यामराव मुन (सावळा, ता. धामणगाव, अमरावती), विवेक सुरेश मिसाळ (अंजनगाव, जि. अमरावती) आणि योगेश मानिक मिलमिले (वरुड, अमरावती) यांचा समावेश आहे.
या सर्वांविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ चे कलम २(१६), २(३६), ९, ३९, ४४, ४८, ४९(ब), ५० व ५१ अन्वये वन गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई दक्षता पथकाचे पि. जी. कोडापे यांच्या नेतृत्वात पथक प्रमुख उमरेडचे सहायक वनसंरक्षक एन. जी. चांदेवार, सहायक वनसंरक्षक रामटेक संदीप गिरी, वनपरिक्षेत्र अधिकारी बुटीबोरी एल. व्ही. ठोकळ, वनरक्षक तवले, जाधव, कुलरकर, शेंडे, पडवळ, मारोती मुंडे, महादेव मुंडे, चव्हाण आदींनी केली.
मार्च-२०१८ मध्ये केली होती शिकार
या सातही जणांनी २०१८ मध्ये मार्च महिन्यात उमरडा येथील वनक्षेत्रात वाघाची शिकार केली होती. नंतर वाघाच्या अवयवांचे आपापसात वाटप केले होते. पैशाच्या लोभापायी त्यांनी ग्राहक मिळाल्यावर संबंधितासोबत संपर्क साधला. गोपनीय सूत्रांकडून ही माहिती वन विभागाला कळल्याने ही कारवाई करण्यात आली.