लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिला अत्याचाराचा विषय सर्वत्र चर्चेला असताना एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. ती म्हणजे एकूण बलात्काराच्या प्रकरणातील ७० टक्के प्रकरणात संबंधित महिलेच्या परिचयातीलच आरोपी असल्याचे उघड झाले आहे.
नागपूर जिल्ह्यातील दोन वर्षांच्या महिला अत्याचाराच्या घटनांचा आढावा घेतला असता तांत्रिक स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. अर्थात, एखाद्या महिलेशी अथवा तरुणीशी अनैतिक किंवा प्रेम संबंध असणे आणि कालांतराने यासंबंधात वितुष्ट आल्यानंतर महिला अथवा तरुणीकडून पोलिसांकडे बलात्काराची तक्रार नोंदविणे. बलात्काराची तक्रार आल्यास बहुतांश प्रकरणात पोलीस तातडीने गुन्हा दाखल करतात. कारण गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ किंवा विलंब केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर वेगवेगळे आरोप होऊ शकतात. अर्थपूर्ण व्यवहाराचाही संशय घेतला जातो. त्यामुळे त्या अधिकाऱ्यावरही कडक कारवाई होऊ शकते. म्हणून महिला अथवा मुलीने कुणाविरुद्ध बलात्काराचा आरोप करणारी तक्रार दिल्यास पोलीस तडकाफडकी गुन्हा दाखल करण्यावर भर देतात.
गेल्या काही वर्षांत नागपूर शहर आणि जिल्ह्यात परप्रांतीय मजुरांचे लोंढे येण्याचे प्रमाण वाढले आहे. नोकरदार आणि कारागीर मंडळीही मोठ्या प्रमाणात येत आहेत. एखाद्या महिला अथवा मुलीशी मैत्री आणि नंतर प्रेम संबंध प्रस्थापित करून आरोपी शरीर संबंध जोडतात आणि नंतर पळून जातात. अशा घटनांचीही वाढ झाली असून, त्यामुळे बलात्काराच्या गुन्ह्यांची संख्याही वाढत असल्याचे पोलीस अधिकारी सांगतात.
----
गुन्हा २०२० २०१९
बलात्कार : ८७ ७०
विनयभंग : २४७ २३०
पोक्सो : १४४ १०४
हुंडाबळी ०३ ००
----
बलात्कारच्या घटना -
परिचितांकडून - ७०%
अपरिचितांकडून - ३०%
---
लग्नाचे आमीष दाखवून
बलात्कार : ३४ (२०२०)
१९ (२०१९)
---
दोन वर्षांत घडलेल्या बलात्काराच्या १६७ पैकी ५३ प्रकरणांमध्ये लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार झाला.
---