लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : तालुक्यात काेराेना संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागातील काेराेनाचा वाढता प्रकाेप पाहता तहसील कार्यालयात आ. राजू पारवे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. तालुक्यातील भयावह स्थिती लक्षात घेता कुही व मांढळ येथे अनुक्रमे ४० व ३० खाटांचे नवीन काेविड केअर सेंटर उभारण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. कुही येथील मुलांचे व मुलींचे वसतिगृह येथे ऑक्सिजन बेड व मांढळ येथील आदर्श संस्कार आश्रमशाळेत हे काेविड सेंटर उभारले जाईल. येत्या दाेन-तीन दिवसात काेविड सेंटर सुरू हाेऊन काेराेनाबाधित रुग्णांना तेथे ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना केल्या.
तालुक्यात दरराेज काेराेना चाचण्या केल्या जात असून, शेकडाे नागरिक पाॅझिटिव्ह येत आहे. पाॅझिटिव्ह रुग्णांना प्राथमिक स्तरावर उपचार करून त्वरित काेराेनामुक्त करण्यासाठी या काेविड सेंटरचा उपयाेग हाेईल. नागपूर शहरात बेड व ऑक्सिजन मिळत नसल्याने ग्रामीण भागातील रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. अशावेळी या काेविड सेंटरचा रुग्णांना याेग्य उपचारासाठी उपयाेग हाेईल. येत्या दाेन दिवसात हे सेंटर सुरू करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
खेड्यापाड्यात पाॅझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. रुग्णांना त्यांच्या घरीच विलगीकरणात ठेवले जाते. ग्रामपंचायत प्रशासन त्यांच्या घरी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून बांबूचे कठडे लावतात. परंतु नागरिक त्याला जुमानत नसून गावागावात संक्रमण वाढत असल्याची बाब यावेळी समाेर आली. विनाकारण काम नसताना अनेक तरुण रस्त्यावर फिरतात. त्यांच्यावर अंकुश लावण्यासाठी पाेलीस यंत्रणा व गावकऱ्यांनी एकत्रित येऊन निर्बंध आणावेत, अशी मागणी बैठकीत केली गेली. काेणताही रुग्ण मृत्युमुखी पडणार नाही, याची खबरदारी प्रशासनासाेबत नागरिकांनी घ्यावी. शासनाने दिशानिर्देशित केलेल्या नियमांचे प्रत्येकाने पालन करावे. तालुक्यात कडक लाॅकडाऊन पाळला जाईल, यासाठी स्थानिक प्रशासन व पाेलिसांनी खबरदारी घ्यावी, कुठेही नियमांचे उल्लंघन हाेणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचनाही आ. राजू पारवे यांनी बैठकीत केल्या. बैठकीला उपजिल्हाधिकारी पर्वणी पाटील, प्रभारी तहसीलदार रमेश पागाेटे, उपविभागीय पाेलीस अधिकारी भीमराव टेळे, खंडविकास अधिकारी मनाेज हिरुडकर, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. राजेश गिलानी, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ. पाटील, नायब तहसीलदार प्रकाश हारगुडे आदींची उपस्थिती हाेती.
....
१,४७४ जणांची काेराेनावर मात
तालुक्यात लसीकरण माेहीम यशस्वीपणे राबविली असून, २० एप्रिलपर्यंत १६,०४३ नागरिकांना पहिला डाेस दिला गेला तर १,०५७ जणांना दुसरा डाेस देण्यात आला आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण २,९५२ काेराेना रुग्ण असून, १,४७४ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. अजूनही १,४१८ नागरिक ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तालुक्यात एकूण ६० जणांचा मृत्यू झाला.