नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमधून रोकड आणि अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. विशेष म्हणजे, रेल्वे सुरक्षा दलाने गेल्या काही दिवसांत या संबंधाने कारवाईचा धडाका लावून रोख रक्कम, सोन्याचांदीचे दागिने आणि विविध प्रकारचे अंमली पदार्थ असा एकूण सव्वा दोन कोटींचा मुद्देमाल पकडून समाजकंटकांना, तस्करांना जोरदार चपराक लगावली आहे.
निवडणूकीचा प्रचार रंगात आला की पैसा आणि मद्य सर्वत्र खैरातीसारखे वाटला जाते. निवडणूक आयोगाने ही बाब लक्षात घेऊन सर्वच तपास यंत्रणांना दक्ष राहून हे गैरप्रकार हाणून पाडण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, १७ एप्रिल २०२४ ला दुरंतो एक्सप्रेसमधून ६० लाखांची रोकड मुंबईत आरपीएफने जप्त केली होती. ही रोकड नागपूरहून एका व्यापाऱ्याने त्याच्या साथीदारांना हाताशी धरून पार्सलमधून मुंबईला पाठविली होती. या घटनेपासून अधिकच सतर्क झालेल्या आरपीएफच्या नागपूर, रायपूर आणि बिलासपूर विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाईचा धडाका लावला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या तीनही विभागात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरपीएफने वेगवेगळ्या रेल्वेगाड्यांत कारवाया करून १४ प्रकरणात ७० लाख, ४० हजार रुपये जप्त केले. ४६ कारवाया करून १ कोटी २३ लाख, ६० हजारांचा ६१७ किलो गांजा जप्त केला. २ लाख, २९ हजार किंमतीच्या ७४२ दारूच्या बाटल्या जप्त केल्या. सोन्याचांदीची तस्करी करण्याचे ४ प्रकरणं उजेडात आणून २४ लाख, ८१ हजारांचे दागिने जप्त केले.
'लोकमत'नेच दिली होती लिड
विशेष म्हणजे, तपास यंत्रणांकडून ठिकठिकाणी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी केली जात असल्यामुळे आणि त्यातून रोकड, दारू पकडली जात असल्यामुळे समाजकंटक, तस्करांनी दुसरा मार्ग शोधला. मोठी रोकड अन् अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी त्यांनी रेल्वेकडे लक्ष केंद्रीत केले. रेल्वेगाड्यांमधून पार्सल आणि व्यक्तींच्या माध्यमातून (कुरियर बॉय) रोख रकमेची हेरफेर चालविली आहे. लोकमतने या संबंधाने २ एप्रिल २०२४ च्या अंकात ठळकपणे वृत्त प्रकाशित केले होते. हीच लिड धरून ठिकठिकाणच्या रेल्वे सुरक्षा दलाने त्यानंतर रेल्वेगाड्यांवर खास नजर रोखली आणि कसून तपासणी चालविली. त्याचमुळे गेल्या महिनाभरात कारवाईचे हे यश पुढे आले आहे.