जगदीश जोशी
नागपूर : मुंबईच्या साकीनाका येथे अत्याचाराच्या क्रूर घटनेपासून धडा घेत नागपूर पाेलिसांनी शहरात विशेष माेहीम सुरू केली आहे. याअंतर्गत बलात्कार आणि विनयभंगाच्या आराेपींवर पाळत ठेवण्यासह टेम्पाे-ऑटाे चालक-मालकांच्या चारित्र्याची तपासणी सुरू केली आहे. विनापरवाना चालणारे वाहन डिटेन्ड करून त्यांचे चालक व मालकांविराेधात कारवाई करण्यात येईल. बलात्कार आणि छेडाछेडीच्या घटनांमध्ये लिप्त असलेल्या ७० आराेपींची ओळख करण्यात आली असून ते पाेलिसांच्या टार्गेटवर राहणार आहेत.
९ सप्टेंबर राेजी मुंबईच्या साकीनाका परिसरात एका महिलेवर टेम्पाेमध्ये बलात्कार करून निर्मम पद्धतीने हत्या करण्यात आली. आराेपी माेहन चाैहानने क्रूरतेची सीमा पार करून महिलेच्या गुप्तांगात सळई टाकली हाेती. त्यामुळे या प्रकरणाची दिल्लीच्या निर्भया घटनेशी तुलना केली जात आहे. नागपूर शहरातही मागील काही दिवसात रस्त्यावर अल्पवयीन विद्यार्थिनींशी छेडछाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ही बाब गंभीरतेने घेत पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ९ सप्टेंबर राेजी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जाेशी यांची भेट घेत शहरातील निर्जन परिसरात तत्काळ पथदिवे लावण्याची सूचना केली. दरम्यान, मुंबईमध्ये घटना घडल्याने नागपूर पाेलीस सतर्क झाले आहेत.
पाेलिसांनी आतापर्यंत बलात्कार तसेच विनयभंगाच्या प्रकरणामध्ये लिप्त असलेल्या आराेपींची कुंडली काढली आहे. ज्या आराेपींवर बलात्कार व विनयभंगाचे एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. असे आराेपी कुठल्याही अनुचित प्रकरणात सापडले तर त्यांच्यावर कठाेर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बलात्कारात सहभागी १२ आणि विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये लिप्त ५८ आराेपींना देखरेख यादीत ठेवण्यात आले आहे. त्यांना कठाेर ताकीद देण्यात आली आहे. यासह महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करून बलात्कार तसेच विनयभंग पीडित महिलांशी संपर्क केला जात आहे. त्यांना काहीही मदत लागली किंवा समस्या असल्यास पाेलिसांशी संपर्क करण्याची सूचना करण्यात आली आहे. याशिवाय टेम्पाे तसेच ऑटाे चालक-मालकांचीही विशेष चाैकशी केली जात आहे. चालक-मालकांच्या चारित्र्याची तपासणी करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लाेकांची ओळख करण्यात येईल. यादरम्यान काही गुन्हा केल्यास त्यांच्यावर कठाेर कारवाई केली जाणार आहे.
आधीच सुरू केली तयारी
पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले, महिलांवरील गुन्हेगारीबाबत पाेलीस गंभीरपणे काम करीत आहेत. मुंबईच्या घटनेच्या आधीच तयारी सुरू करण्यात आली आहे. महिलांच्या मदतीसाठी पाेलिसांचे टाेल फ्री क्रमांक सक्रिय करण्यात आले आहेत. उद्याेजक, माेठ्या कंपन्या व काॅल सेंटरच्या प्रमुखांची बैठक घेऊन रात्री उशिरापर्यंत कार्यस्थळाहून घरी जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यांना काही समस्या उद्भवल्यास पाेलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.