लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते, कीटकनाशके मिळावीत व त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी आयुक्तालयाच्या वतीने नागपूर विभागात ७० भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत विभाग, जिल्हा व तालुकास्तरावर बियाणे, खते व कीटकनाशकासंबंधी कुठलीही तक्रार आढळल्यास पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.नागपूर विभागांतर्गत नागपूर जिल्ह्यात १५, वर्धा जिल्ह्यात ९, भंडारा येथे ८, गोंदिया येथे ९, चंद्रपूर येथे १६ तसेच गडचिरोली येथे १३ पथके तयार करण्यात आली आहेत. विभागस्तरावर तंत्र अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) वाय. एस. जुमडे पथक प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळतील. याशिवाय जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी पथकाचे कामकाज पाहतील.अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ नुसार विक्रेत्यांनी दरफलक व साठाफलक दुकानाच्या दर्शनी भागात लावणे, वैध मुदतीतील बियाणे विक्री करणे, जास्त दराने बियाणे व खते विकणाऱ्या दुकानदाराकडून खरेदीचे पक्के बिल मागणे आदी बाबींवर शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. बियाणे व खतांच्या बॅगवर असलेल्या किमतीपेक्षा जास्त किंमत घेत असल्याची, विशिष्ट कंपनीचे बियाणे व खते घेण्यास बाध्य करणे, उपलब्धता नसणे, गुणवत्तेबाबत शेतकरी कुठल्याही प्रकारची तक्रार जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी तसेच विभागीय स्तरावरील तंत्र अधिकारी यांच्याकडे नोंदवू शकतात.विक्रेत्यांनी पाकीट व बॅगवरील माहिती बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करूनच विक्री करावी. माल विक्रीच्या वेळी पक्के बिल द्यावे, बिलावर शेतकºयांचे नाव, निविष्ठेचे नाव, कंपनीचे नाव, लॉट नंबर, बॅच नंबर, उत्पादन तारीख नमूद करावी.येथे करा तक्रारशेतकरी तक्रार नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० तसेच विभागस्तर ०७१२-२५५९८१५, ९८३४८८६६२४, जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी, नागपूर ९५२७८६६६७५, कृषी विकास अधिकारी वर्धा ९४२३८९१४४५, कृषी विकास अधिकारी भंडारा ९६३७१८६७०४, कृषी विकास अधिकारी गोंदिया ९४२०८०६४३०, कृषी विकास अधिकारी चंद्रपूर ९४०४८१०३५८ तसेच कृषी विकास अधिकारी गडचिरोली ९४२२२७७४२१ वर संपर्क साधू शकतात, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक यांनी दिली आहे.