नागपूर : ‘ओबेसिटी’ हा लठ्ठपणाशी संबंधित आजार. परंतु हा एक आजार असल्याचे फार कमी जणांना माहिती आहे. परिणामी त्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात आणि मृत्यूला सामोरे जातात. याची दखल घेत मेडिकलच्या शल्यचिकित्सा विभागाने बेरियाट्रिक शस्त्रक्रियेला सुरूवात केली. मागील १० वर्षांत या विभागाने ७००वर रुग्णांवर ही शस्त्रक्रिया करीत त्यांचा लठ्ठपणा दूर केला. विशेष म्हणजे, लठ्ठपणावर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात सर्वात प्रथम डॉ. राज गजभिये यांनी शासकीय रुग्णालयात बेरियाट्रिक शस्त्रक्रिया सुरू केली.
भारतात जंकफूड, अल्कोहोलचे वाढते प्रमाण व अयोग्य जीवनशैलीमुळे पाचपैकी एक पुरुष किंवा स्त्री लठ्ठपणाने ग्रस्त आहे. अनियंत्रित वजनामुळे मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, आर्थ्रायटिस, कर्करोग, अॅथरोस्केरासिस आदी आजाराचे रुग्ण वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) २.८ दशलक्ष प्रौढ व्यक्ती या फक्त लठ्ठपणाच्या कारणाने दरवर्षी मरण पावतात. ‘डब्ल्यूएचओ’नुसार ओबेसिटीमुळे ४४ टक्के लोक मधुमेहामुळे, २३ टक्के लोक हृदयरोगामुळे तर ७.४१ टक्के लोक कर्करोगाला बळी पडतात. सर्वाधिक लठ्ठ असलेल्या लोकांमध्ये जगात भारताचा क्रमांक तिसरा लागतो. याची गंभीर दखल घेत मेडिकलच्या शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. राज गजभिये यांनी शासकीय रुग्णालयांमध्ये बेरियाट्रिक शस्त्रक्रियेला सुरूवात केली. मेडिकलमध्ये अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत ७००वर या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. रुग्णांना याचा मोठा फायदा झाला आहे.
-१७० किलो वजनाच्या पुरुषावर यशस्वी शस्त्रक्रिया
मेडिकलमध्ये आतापर्यंत झालेल्या बेरियाट्रिक शस्त्रक्रियेमध्ये सर्वाधिक वजनाच्या म्हणजे, १७० किलो वजनी पुरुषावर बेरियाट्रिक सर्जरी डॉ. गजभिये यांनी नुकतीच यशस्वी केली. शस्त्रक्रियेनंतर या पुरुषाचे वजन ९५ किलो झाले असून या शस्त्रक्रियेमुळे तब्बल ७८ किलो वजन कमी झाले आहे. ते आता सामान्य जीवन जगत आहेत.
शस्त्रक्रियेत या डॉक्टरांचा सहभाग
डॉ. राज गजभिये यांच्या मार्गदर्शनात डॉ. भूपेश तिरपुडे, डॉ. हेमंत भानारकर, डॉ. विक्रांत आकुलवार, डॉ. गायत्री देशपांडे, डॉ. गिरीश कोडापे, डॉ. सागर कुरकुरे, डॉ. भूषण त्रिवेदी, बधिरीकरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बारसागडे, डॉ. डुमणे यांच्यासह निवासी डॉक्टर व परिचारिकांचे सहकार्य मिळत आहे.
विनाचिरा ‘बेरियाट्रिक सर्जरी’
लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक जण बेरियाट्रिक सर्जरीकडे वळू लागले आहेत. हीच शस्त्रक्रिया आता विना चिरा देऊन करणे शक्य झाले आहे. ‘एण्डोस्कोपी’च्या मदतीने ‘बेरियाट्रिक सर्जरी’ केली जात असल्याने याचा फायदा विशेषत: महिलांना होत आहे.
-डॉ. राज गजभिये
प्रमुख, शल्यचिकित्सा विभाग, मेडिकल
-कोरोनानंतर आता पुन्हा बेरियाट्रिक सर्जरी
कोरोनानंतर नव्या वर्षात पुन्हा बेरियाट्रिक सर्जरीला सुरूवात झाली आहे. या शस्त्रक्रिया नि:शुल्क केल्या जातात. यामुळे विदर्भासह मध्यभारतातील रुग्णांना याचा फायदा होत आहे.
-डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल