नागपूर :रेल्वेकडून काहीही कारवाई झाली तरी त्याचा फुकट्या आणि बेशिस्त प्रवाशांवर कवडीचा फरक पडत नाही. सध्या मध्य रेल्वेच्यानागपूर विभागात सुरू असलेल्या विशेष तिकिट तपासणी मोहिमेत अवघ्या दोन आठवड्यात तब्बल ७१, ४५९ प्रवासी टीसींच्या हाती लागले. यावरून त्याचा प्रत्यय यावा.
सध्या रेल्वे गाड्यातील गर्दीत मोठी वाढ झाली आहे. अशात एसीचे किंवा स्लिपरचे तर सोडा, जनरलचेही तिकिट जवळ नसताना अनेक प्रवासी एसीच्या डब्यात शिरतात. त्यामुळे आरक्षित तिकिट घेऊन बसलेल्या प्रवाशांना नाहक गर्दीचा त्रास सहन करावा लागतो. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी सध्या वाढल्या आहेत. त्याची दखल घेऊन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सध्या तिकिट तपासणीची विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे.
२४ एप्रिल ते १० मे या दोन आठवड्यांच्या कालावधीत विविध मार्गावरील रेल्वेगाड्या आणि स्थानकांवर तपासणी सुरू असताना चक्क ७१, ४५९ प्रवासी तिकिट तपासणी करणाऱ्यांच्या (टीसी) हाती लागले. अनेक जण विधाऊट तिकिट प्रवास करतानाच भारी भरकम सामानही रेल्वेतून घेऊन जात असल्याचे उघड झाले. अशा सर्व प्रवाशांकडून टीसींनी चक्क ४ कोटी, ५१ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
विशेष पथकं तैनात
रेल्वे गाड्यातील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार, विविध डब्यांमध्ये वेगवेगळ्या चमू तैनात करण्यात आल्या आहेत. ज्या दर्जाचे तिकिट त्याच डब्यातून प्रवास, असे धोरण या चमूंनी स्विकारले आहे. जनरलचे तिकिट असताना स्लिपर किंवा एसीमध्ये कुणी चढू नये, यासाठीही विशेष काळजी घेतली जात आहे.