नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या ७२ वर्षे वयाच्या आरोपी टेलरला तीन वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली, तसेच एकूण सात हजार रुपयाचा दंड ठोठावला. न्या. आर. पी. पांडे यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. ही घटना सीताबर्डी पोलिसांच्या क्षेत्रातील आहे.
दशरथ गोविंद बागडे असे आरोपीचे नाव असून तो धरमपेठ येथील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी पीडित मुलगी ११ वर्षे वयाची होती. तिच्या आईने मुलींना कपडे शिवण्यासाठी आरोपीकडे साडी दिली होती. ११ जून २०२० रोजी आरोपीने पीडित मुलीला बोलावले व मशीन खराब झाल्यामुळे साडी परत घेऊन जाण्यास सांगितले, तसेच मुलीला दुकानात नेऊन दार बंद केले. दरम्यान, आरोपीने मुलीचा विनयभंग केला. मुलगी ओरडल्यानंतर एका महिलेने दार उघडले. त्यामुळे मुलीने घरी जाऊन आईला आपबीती सांगितली. त्यानंतर आईने आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. आसावरी परसोडकर यांनी कामकाज पाहिले. त्यांनी विविध पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला.