योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सायबर गुन्हेगारांच्या शेअर्स ट्रेडिंगच्या फंड्याला भुलून ७.२३ लाख रुपये गमाविणाऱ्या तरुणाला सायबर पोलिसांमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सायबर पोलीस ठाण्यातील पथकाने तांत्रिक माध्यमातून तपास करत गुन्हेगारांच्या बॅंक खात्यातून तरुणाला पैसे परत मिळवून दिले.
रजत भैय्या आसटकर (२९, टीचर्स कॉलनी, नरसाळा) या तरुणाला जानेवारी महिन्यात फेसबुकवर ग्लोबल वर्क ग्रुप नावाने जाहिरात दिसली. व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करून लाईक केल्यास प्रति लाईक ६० रुपये मिळतील असे त्याला सांगण्यात आले होते. रजतने तसे केले असता त्याच्या खात्यावर काही पैसे जमा झाले. आरोपींवर त्याला विश्वास झाला व तो त्यांच्या टेलिग्राम ग्रुपला जुळला. त्यानंतर आरोपींनी त्याला शेअर ट्रेडिंग केल्यास जास्त नफा होईल असे आमिष दाखविले. रजतने ७.२३ लाख रुपये गुंतविले. मात्र आरोपींनी कुठलाही परतावा न देता त्याच्याशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रजतने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपींच्या बॅंक खात्याचा मनी ट्रेल काढला. त्यावरून जेथे पैसे गेले होते ती खाती गोठविण्यात आली. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून रजतला ७.२३ लाख रुपये परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले. पोलीस निरीक्षक अमित डोळस, अमोल देशमुख, विजय भिसे, गजानन मोरे, श्रीकांत गोनेकर, शारदा खाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.