लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय सेवेतील ७२३ पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यातील सर्वाधिक पदे विदर्भातील आहेत. विशेष म्हणजे, जे डॉक्टर १० दिवसात रुजू होणार नाहीत, अशा डॉक्टरांची सेवा संपुष्टात आणून प्रतीक्षा यादीतील डॉक्टरांना संधी दिली जाणार आहे. या पदांमुळे आरोग्य विभागातील कामकाजाला गती येईल, असा विश्वास राज्याचे आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी येथे व्यक्त केला.विदर्भासह आजूबाजूच्या राज्यात वाढत असलेल्या स्क्रब टायफस संदर्भात डॉ. कांबळे यांनी रविवारी नागपूरच्या उपसंचालक आरोग्य विभागाच्या कार्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर ते ‘लोकमत’शी बोलत होते.डॉ. कांबळे म्हणाले, आरोग्य विभागात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रियेसाठी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पुढाकार घेतल्याने राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील वर्ग ‘अ’ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदभरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.पहिल्या टप्प्यात एकूण ७२३ पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी कार्यालयात सुमारे साडेतीन हजार अर्ज आले आहेत. यामुळे एका डॉक्टराची नियुक्ती झाली आणि १० दिवसात ते रुजू झाले नाहीत तर त्या जागी प्रतीक्षा यादीतील डॉक्टरांची वर्णी लावली जाणार आहे. परिणामी, सर्व पदे भरली जाण्याची शक्यता आहे.
स्क्रब टायफसवर नियंत्रणासाठी सर्वाेतोपरी प्रयत्नडॉ. कांबळे म्हणाले, स्क्रब टायफसवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाकडून सर्वाेतोपरी प्रयत्न होत आहे. या रोगाची गंभीर दखल आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी घेतली. त्यांच्या सूचनेनुसार उपाययोजना सुरू आहेत. स्क्रब टायफस संशयित रुग्ण आढळून येताच ‘डॉक्सीसायक्लीन’ हे औषध देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मेडिकलमध्ये ‘एलायझा’ चाचणी उपलब्ध करून देण्यात आली असून ‘डॉक्सीसायक्लीन’ औषधेही देण्यात आली आहे. शिवाय, लोकांची जनजागृतीसाठी पत्रके वाटली जात आहेत. कीटकनाशक फवारणीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सध्या स्क्रब टायफस नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत ४१ रुग्ण व १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ३१ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले असून उर्वरीत ११ रुग्ण हे मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशातील आहेत.
आयएमए, निमा, आयुषची मदत घेणारस्क्रब टायफसवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’सह(आयएमएए), निमा, आयुष व इतरही वैद्यकीय संघटनांची मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या आरोग्य विभागाच्या ‘कंट्रोल रुम’ला स्क्रब टायफसची नोंद घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असल्याचे डॉ. कांबळे म्हणाले.
घरात डेंग्यूच्या अळ्या दिसल्यास दंडात्मक कारवाईडेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. डेंग्यू रोगाचा प्रादुर्भाव, प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती ही सर्वात जास्त नागरिकांच्या घरात आणि घर परिसरात साठलेल्या पाण्यात होते. उदा. पाण्याची टाकी, रांजण, माठ, कूलर, फ्रिजमागील ट्रे, हौद, फुलदाणी, टायर, भंगार वस्तू, घराचे छत आदी ठिकाणे डासांची उत्पत्ती स्थाने आहेत. बहुतांश नागरिक डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेत असले तरी काही जणांकडून त्याकडे दुर्लक्ष होते. डास उत्पत्ती प्रतिबंधात्मक कार्यवाहीबाबत आरोग्य विभागाकडून शिक्षण दिले जाते. तरीदेखील काही नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने आता दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती डॉ. कांबळे यांनी दिली. यावेळी उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, डॉ. फारूखी, सहायक संचालक (हिवताप) डॉ. मिलिंद गणवीर व इतरही अधिकारी उपस्थित होते.