लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या संसर्गाची दाहकता कायम असून बुधवारीदेखील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सात हजारांहून वर गेली. मात्र, अनेक दिवसांनी नव्या बाधितांपेक्षा ठीक होणाऱ्यांची संख्या जास्त होती. २४ तासांत जिल्ह्यातील तब्बल ७ हजार २६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. येत्या काळात हे प्रमाण असेच कायम रहावे, अशी अपेक्षा वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.
बुधवारी जारी झालेल्या अहवालानुसार नागपूर जिल्ह्यात एकूण ७ हजार २२९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यात शहरातील ४ हजार ७८७ व ग्रामीणमधील २,४३४ रुग्णांचा समावेश आहे, तर ९८ जणांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये ग्रामीणमधील ३८, शहरातील ५२ व जिल्ह्याबाहेरील ८ जणांचा समावेश होता.
आरटीपीसीआरच्या १५ हजार चाचण्या
बुधवारी एकूण २४ हजार १६३ चाचण्या झाल्या. यात आरटीपीसीआरच्या १५ हजार ३५६ तर ॲन्टिजनच्या ८ हजार ८०७ चाचण्यांचा समावेश आहे.
रुग्णसंख्या साडेतीन लाखांजवळ
नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ४३ हजार ५८९ कोरोनाबाधित आढळले आहेत. रुग्णांची दररोजची संख्या लक्षात घेता पुढील २४ तासांत हा आकडा साडेतीन लाखांचा टप्पा पार करू शकतो. मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ६ हजार ५७५ झाली आहे. यात जिल्ह्याबाहेरील ९७६ रुग्णांचा समावेश आहे.
५५ हजार रुग्ण गृह विलगीकरणात
कोरोना झाल्यानंतर प्रत्येकच रुग्णाला दवाखान्यात भरती होण्याची गरज नसते. नागपूर जिल्ह्यात ५५ हजार ५२४ रुग्ण गृह विलगीकरणात असून १६ हजार ३३ रुग्ण विविध सरकारी व खाजगी रुग्णालयांत दाखल आहेत.
शहरात ४३ हजार ॲक्टिव्ह रुग्ण
सद्य:स्थितीत नागपूर जिल्ह्यात ७१ हजार ५५७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यात शहरातील ४३ हजार ७५४ व ग्रामीणमधील २७ हजार ८०३ बाधितांचा समावेश आहे.