नागपूर : इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन (आयपीसीए) आणि फार्मास्युटिकल सायन्स विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांच्या संयुक्त वतीने २० ते २२ जानेवारी दरम्यान ७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस (आयपीसी)चे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील जमनालाल बजाज प्रशासकीय भवन इमारतीच्या परिसरात हे आयोजन होत आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर नागपूरला ही संधी मिळाली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, एसीजी कॅप्सूल लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. अजित सिंग, डीजीसीआय भारत सरकार डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांचीही उपस्थिती राहणार आहे.
७२ व्या आयपीसीची संकल्पना गुणवत्तापूर्ण आणि परवडणारी वैद्यकीय उत्पादने सहज प्राप्त करता येणे या विषयावर केंद्रित आहे. यात जेनक्रेस्ट इनकॉर्पोरेशन औषध निर्मिती उद्योगांमधील २० पेक्षा अधिक अध्यक्ष, सीईओ आणि एमडी, संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी यांच्यासह सुमारे दहा हजार प्रतिनिधी या काँग्रेससाठी एकत्र येत आहेत.
१३ सिम्पोजियम, ३९ व्याख्याने, ८५ वक्ते
या आयपीसीमध्ये वैद्यकीय उपकरणांचा एक्स्पो, ब्लॉक चेन तंत्रज्ञानावरील वैज्ञानिक सत्रे, विविध कार्यक्रम तसेच विविध विषयांवरील कॉन्क्लेव्ह होत आहेत. १३ सिम्पोजियम आणि पूर्ण सत्रांतर्गत ३९ व्याख्याने असून, एकूण ८५ वक्ते, रिसोर्स पर्सन येत आहेत.
वैद्यकीय उपकरणे, मशिनरी, पुस्तकांचा समावेश
यात फार्मा उद्योग आणि व्यापाऱ्यांच्या भविष्यातील आस्थापनांसाठी, देशभरातील २०० हून अधिक प्रदर्शकांच्या सहभागासह एक मेगा फार्मा आणि यंत्रसामग्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. एक्स्पोमध्ये प्रथमच वैद्यकीय उपकरणांचे स्टॉलदेखील असतील.
विविध विषयांवर चर्चासत्र, परिसंवाद
उद्घाटन सत्रानंतर अध्यक्षीय परिसंवादासोबतच 'मेडिकल डिव्हाईस इंडस्ट्री : व्हिजन २०३०', 'फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी आणि डीडीएसमधील प्रगती', 'डिजिटल थेरप्युटिक्स आणि रेग्युलेटरी अफेअर्स : डायनॅमिक्स, ड्रग डिस्कव्हरी : ब्रेकथ्रू आणि इमर्जिंग ट्रेंडिंग', 'ट्रान्सफॉर्मिंग इन्फेक्ट्स' या विषयांवर परिसंवाद आयोजित केले आहेत. याशिवाय फार्मसी व्यवसाय : एफआयपी विकास उद्दिष्टे 'सीपीए आणि एएआयपीएस', 'कर्करोग संशोधन : ट्यूमर टार्गेटिंग आणि उपचार' या विषयावर चर्चासत्र, परिसंवाद होत आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी
प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, जावेद अली आणि नितीन मुकेश यांचे म्युझिकल लाइव्ह कॉन्सर्ट आणि नागपुरातील फुटाळा येथे जगप्रसिद्ध फ्लोटिंग म्युझिकल फाउंटन शो या अंतर्गत होणार आहे.