नागपूर विद्यापीठ : पहिल्या टप्प्यात ८९६ परीक्षार्थी उत्तीर्णनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ‘पेट’ परीक्षेच्या पहिल्या टप्प्याचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. एकूण उपस्थितांपैकी सुमारे २६ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून उर्वरित ७४ टक्के दुसऱ्या टप्प्यासाठी अपात्र ठरले आहेत. १ ते ३ सप्टेंबरदरम्यान ‘आॅनस्क्रीन’ परीक्षा घेण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात उत्तीर्ण झालेले परीक्षार्थी २५ सप्टेंबर रोजी पुढील परीक्षेला सामोरे जातील.यंदापासून विद्यार्थ्यांना प्रथमच ‘पेट’च्या दुहेरी आव्हानाचा सामना करायचा आहे. प्रथम वस्तुनिष्ठ ‘आॅनस्क्रीन’ परीक्षा व त्यानंतर पात्र ठरल्यास लेखी परीक्षा या दोन टप्प्यांत ही परीक्षा होणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा भवन आणि ‘कॅम्पस’ येथील ग्रंथालय या दोन केंद्रावर १ ते ३ सप्टेंबर या कालावधीत ‘पेट’चा पहिला टप्पा पार पडला. ‘पेट’साठी ३७७१ उमेदवारांना परीक्षा प्रवेशपत्र पाठविण्यात आले. यापैकी ३४४८ उमेदवारांनीच परीक्षा दिली. ‘पेट’च्या पहिल्या टप्प्याची परीक्षा हिंदी, मराठी व इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये परीक्षा घेण्यात आली.बुधवारी ‘पेट’च्या पहिल्या टप्प्याचा निकाल ‘आॅनलाईन’ जाहीर करण्यात आला. यात ८९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेला पात्र ठरविण्यात आले असून धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)दुसरा टप्पा अडचणीचा‘पेट’च्या दुसऱ्या टप्प्याची परीक्षा २५ सप्टेंबरला घेण्यात येणार आहे. ही परीक्षा लेखी स्वरूपाची राहणार असून ६६ पैकी ५४ अभ्यासक्रमाचे विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. पेपर १०० गुणांचा राहणार असून पाच प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला २० गुण राहणार आहेत. मागील वर्षी ‘पेट’मध्ये १८ टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्या तुलनेत पहिल्या टप्प्याचा निकाल चांगला लागला आहे. दुसऱ्या टप्प्याच्या सर्व प्रश्नपत्रिका तयार असून ही परीक्षा सुरळीत पार पडेल, असा विश्वास प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केला.
७४ टक्के उमेदवार ‘पेट-२’साठी अपात्र
By admin | Published: September 08, 2016 2:30 AM