नागपूर : ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ (जीबीएस) या दुर्मीळ आजाराने १९ वर्षीय दिव्याचा शरीरातील मांसपेशी कमजोर पडल्या. ‘पॅरालिसीस’मुळे दोन्ही हातपाय लुळे पडले. याचा प्रभाव श्वास यंत्रणेवरही झाला. गंभीर स्थिती निर्माण झाल्याने व्हेंटिलेटरवर ठेवले. यादरम्यान फुफ्फुसांमध्ये ‘म्युकस ब्लॉक’, न्युमोनिया, कमी-जास्त रक्तदाब, डायरियाही झाला. दिव्याला वाचविण्यासाठी मेडिकलच्या डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न केले. दिव्यानेही काळाशी झुंज दिली. या यशस्वी संघर्षाच्या प्रवासात ७५ दिवसांनी ती व्हेंटिलेटरमधून बाहेर आली, जगण्याची नवी उमेद मिळाली.
दिव्या अकोला येथील रहिवासी. डिसेंबर महिन्यात अचानक तिच्या हातापायांना पॅरालिसीस झाले. मानही उचलता येत नव्हती. अकोला येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. ‘जीबीएस’ नावाच्या दुर्मीळ आजाराचे निदान झाले. तिच्यावर १५ दिवसांचा उपचाराचा खर्च १६ लाखांवर गेला. हालाखीच्या स्थितीत असलेल्या आई-वडिलांवर शेती, दागिने विकण्याची वेळ आली; परंतु पैसे संपल्याने १५ जानेवारीला दिव्याला नागपूर मेडिकलमध्ये आणले. दिव्याची गंभीर स्थिती पाहून डॉक्टरांनी तातडीने वॉर्ड क्रमांक ५२ मधील ‘आयसीयू’मध्ये भरती केले. व्हेंटिलेटरवर घेतले. वरिष्ठ डॉक्टरांच्या नेतृत्वात निवासी डॉक्टर, त्यांच्यासोबतीला परिचारिकांनी उपचाराला सुरुवात केली.
जनआरोग्य योजनेतून उपचार
दिव्याच्या दुर्मीळ आजारावरील औषधांचा खर्च मोठा होता. औषधीची एक बॉटल सात ते आठ हजार रुपयांची होती. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत तिची नोंदणी करण्यात आली. योजनेचा मोठा आधार मिळाला.
व्हेंटिलेटरवर असताना अनेक आव्हाने
व्हेंटिलेटरवर असताना दिव्याला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. तिच्या फुफ्फुसांमध्ये म्युकस ब्लॉक झाला. फुफ्फुसाच्या एका भागाचे काम कमी झाले. डॉक्टरांनी प्रचंड मेहनत घेऊन तो ‘ब्लॉक’ काढला. थोड्या दिवसांनी तिला न्युमोनिया झाला. तिचा रक्तदाब कमी-जास्त होत होता. तिला डायरियाही झाला होता.
हातपाय हलविणे अशक्य असलेल्या दिव्याने केला नमस्कार
सलग चार महिने ती ‘आयसीयू’मध्ये असल्याने डॉक्टरांसह परिचारिकांची ती छोटी बहीण झाली. डॉक्टरांच्या उपचाराला ती प्रतिसाद देत होती. यामुळे ७५ दिवसांनी व्हेंटिलेटरमधून बाहेर आली. सुरुवातीला हातपाय हलविणेही अशक्य असलेल्या दिव्याने सोमवारी रुग्णालयातून घरी जाताना डॉक्टर, परिचारिकांना दोन्ही हातांनी नमस्कार केला. तिच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव होते.
या डॉक्टरांच्या प्रयत्नांना आले यश
दिव्या आज नाही तर उद्या बरी होईल, या आशेवर आई-वडील आयसीयूबाहेर उघड्यावर दिवस-रात्र काढत होते. त्यांच्या जेवणाची सोय डॉक्टरांनी केली. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्यासह मेडिसीनचे युनिट इन्चार्ज डॉ. मिलिंद व्यवहारे, आयसीयू इन्चार्ज डॉ. प्रवीण शिंगाडे, डॉ. हरीश सपकाळ, डॉ. राधा ढोके, डॉ. रिया साबू, डॉ. सजल बन्सल, डॉ. पूजा बोरलेपवार, डॉ. सुमित मांगले, डॉ. विशाल बोकडे, डॉ. ज्योत्स्ना, डॉ. मयूर रुके, डॉ. श्रद्धा झंवर यांच्यासह सर्व नर्सिंग स्टाफ यांनी उपचारात विशेष मेहनत घेतली.