लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यातील ७५ हजार विद्यार्थ्यांकडे ना आधार कार्ड आहे ना त्यांचे बँकेत खाते आहे. त्यामुळे पोषण आहार योजनेचे अनुदान त्यांच्या खात्यात कसे वळते करायचे हा प्रश्न शिक्षण विभागापुढे उभा ठाकला आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाने कोरोनाकाळातील एप्रिल ते मे महिन्यातील शालेय पोषण आहाराचे अनुदान डीबीटी तत्वावर विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वळते करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात जिल्ह्यातील २ लाख ९८ हजार विद्यार्थी पात्र ठरले होते. परंतु त्यातील ७५ हजार विद्यार्थ्यांकडे बँकेत खाते काढण्यासाठी आधार कार्डच उपलब्ध नसल्याची माहिती आहे.
संचालनालयातर्फे एप्रिल ते मे महिन्यातील ३५ दिवसाचा पोषण आहार हा रोख स्वरुपात देण्यात येत आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १५६ रुपये व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना २३४ रुपये अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश संचालनालयाचे होते. पण बहुतांश विद्यार्थ्यांचे बँक खाते नसल्याने शिक्षण विभागापुढे पेच पडला होता. शिक्षण विभागाने पालकांना विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याचे आवाहन केले होते. पण विद्यार्थ्यांकडे आधार कार्डच नसल्याने बँक खाते कसे काढायचे असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे, आधारकार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी हे इयत्ता पहिल्या वर्गाचे आहेत.
- दृष्टिक्षेपात
१ ते ५ वर्गाचे १,६२,६९५ विद्यार्थी पोषण आहार अनुदानास पात्र
६ ते ८ वर्गाचे १,३५,४१८ विद्यार्थी पोषण आहार अनुदानास पात्र
- प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पोषण आहाराचे अनुदान विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले होते. पण विद्यार्थ्यांचे बँक खातेच नसल्याचे पुढे आले. आता संचालनालयाने आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकाच्या बँक खात्यात पोषण आहाराचे अनुदान टाकण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.
चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी, जि.प. नागपूर