लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षण विभागाच्या आदेशांना धाब्यावर बसवत अनेक ‘सीबीएसई’ शाळांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अतिरिक्त शुल्कवसुली करण्यात येते. वर्धा मार्गावरील नारायणा विद्यालयमकडून याच पद्धतीने तीन वर्षांत ७ कोटी ५९ लाखांहून अधिकचे अतिरिक्त शुल्क घेण्यात आले. जागरूक पालकांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण संस्थेला धक्का दिला आहे. महिनाभरात ही रक्कम पालकांना परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ माजली आहे.
नारायणा विद्यालयमकडून अवास्तव शुल्काची आकारणी होत असल्याच्या तक्रारी पालकांनी शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे केल्या होत्या. या तक्रारींच्या आधारावर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी २ सप्टेंबर रोजी चौकशी समिती गठित केली. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी २७ ऑक्टोबर रोजी आढावा सभेत संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. तपासणी पथकाने शाळेकडे २०१२-१४ पासूनच्या शुल्काची माहिती मागितली होती. शाळेतर्फे माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. अखेर मुख्याध्यापकांनी जी कागदपत्रे दिली त्याची तपासणी केली असता २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या पालकांकडून ७ कोटी ५९ लाख २९ हजार ४६० रुपयांची अतिरिक्त रक्कम घेतली असल्याची बाब समोर आली. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियमन कायद्यानुसार सत्र शुल्क हे एका महिन्याच्या शिक्षण शुल्काइतकेच घेण्याची तरतूद आहे. मात्र नारायणा विद्यालयमने त्याहून अधिक शुल्क वसूल केले. यासंदर्भात सखोल चौकशीनंतर शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांच्याकडून संबंधित निर्देश जारी करण्यात आले. शाळेला पालकांना महिनाभरात अतिरिक्त शुल्क वापस करायचे असून त्याचा अहवालदेखील शिक्षण उपसंचालक कार्यालयाला सादर करावा लागणार आहे.