लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - कर्जदाराकडून घेतलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करीत त्याच्या खात्यातील ७६.६५ लाखाची रक्कम परस्पर दुसऱ्या खात्यात वळवून त्या रकमेचा अपहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चंद्रपूरच्या दोघासह सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दीपककुमार पारेख (रा. आझाद गार्डन चंद्रपूर), अजय एचकुलवार (भगवाननगर, हावरापेठ), अरुण मनोहर बनकर (चंद्रपूर), मदनिया (रा. म्हाडा कॉम्प्लेक्स, हिस्लाॅप कॉलेज मागे), पुसनदास दिनेश ठाकूर (रा. कलानगर, वाडी) आणि आनंद नागरी सहकारी बँक लिमिटेड चंद्रपूरचा तत्कालीन बँक व्यवस्थापक अशी आरोपींची नावे आहेत.
कोतवाली तुळशीबागच्या स्वामी समर्थ मठाजवळ राहणारे उत्तम यशवंत बोरकर (वय ३८) यांनी त्यांची जमीन तारण ठेवून २०१३ ते २०१७ या कालावधीत बँकेतून ७५ लाखाचे कर्ज घेतले. २०१९ मध्ये शासनाला रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक असल्याने त्यांच्या जमिनीतील ७५ स्क्वेअर मीटर जागा अधिग्रहित केली. त्याबदल्यात नागपूर महापालिकेने २६ जून २०१९ ला बोरकर यांच्या बँक खात्यात ७६ लाख ६५ हजार ३०० रुपये जमा केले. उपरोक्त आरोपींनी या घडामोडीपासून बोरकर यांना अंधारात ठेवले. त्यांच्याकडून खाते रिन्युअल करण्याच्या नावाखाली कोरे सह्या केलेले स्टॅम्पपेपर, फर्मचे लेटरहेड, सह्या केलेले कोरे चेक घेऊन त्याआधारे बोरकर यांची ही रोकड हनुमान ट्रेडिंग आणि इतर खात्यात परस्पर वळती केली. अधिकार नसताना आणि बोरकर यांच्याकडून कोणतीही परवानगी न घेता आरोपींनी या रकमेचा अपहार केला. यासंबंधाने बोरकर यांनी आरोपींकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे बोरकर यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर रविवारी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
अनेकांची फसवणूक
या प्रकरणातील काही आरोपींची बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीशी संबंध असल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलीस त्या अनुषंगानेही तपास करीत आहेत.