लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहानमधील एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या (एआयईएसएल) एमआरओमध्ये पुढील आठवड्यात जम्बो जेट बोइंग-७७७ विमान लँडिंग गिअरची देखभाल व दुरुस्तीसाठी आणण्यात येणार आहे. या विमानामुळे एमआरओमध्ये तिसरी लँडिंग गिअरची देखभाल व दुरुस्ती होणार आहे.
एअर इंडियाचे हे विमान अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को, शिकागो, न्यूयॉर्क आणि अन्य शहरांसाठी चालविण्यात येते. विमान दहा वर्षांपर्यंत चालले आहे. त्यामुळे त्याच्या लँडिंग गिअरचे पिरियॉडिकल ओव्हरहॉल करणे आवश्यक आहे. एअर इंडियाकडे जवळपास १६ बोइंग-७७७ विमाने आहेत. त्यापैकी काही विमानांना महिन्यातच तर काही एक वा दोन वर्षांत दहा वर्षे पूर्ण होणार आहेत. लॉकडाऊनदरम्यान एअर बबल करारांतर्गत अन्य एअरलाइन्सच्या तुलनेत एअर इंडियाची विमाने विदेशात जास्त उडाली आहेत. नागपूर एमआरओमध्ये लँडिंग गिअरच्या देखरेखीसाठी आणण्यात येणाऱ्या विमानाची दुरुस्ती व देखभाल जवळपास दीड महिने चालणार आहे.