लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने नागपूर व मध्य प्रदेशच्या सीमेवर बॉर्डर (सीमा) पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाने रामटेक लोकसभा मतदार संघांतर्गत असलेल्या देवलापार जवळील मानेगाव टेक नाक्यावर ७ लाख ८० हजार रुपये पकडले. सीमा पथकाची ही पहिलीच मोठी कारवाई म्हणता येईल.रामटेकचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमा पथके तयार झाली आहेत. देवलापारजवळ असलेल्या मानगाव टेक येथील सीमा नाक्यावर पथकाद्वारे नियमित तपासणी केली जात आहे. गुरुवारी सुद्धा ही तपासणी सुरु होती. दरम्यान एमजी २२ जीए ४९३७ या क्रमांकाची स्वीफ्ट कार शिवनी वरून नागपूरकडे येत होती. सीमा पथकाने ही कार रोखली तेव्हा चालक व्यवस्थित उत्तर देत नव्हता त्यामुळे पथकाला त्याच्यावर संशय आला. रामनारायण शाहू नावााची व्यक्ती कार चालवत होती तर इतर तिघे जण कारमध्ये बसले होते. कारची झडती घेतली असता त्यात ७ लाख ८० हजार ८८० रुपये सापडले. कर्मचाऱ्यांनी या पैशाबाबत विचारपूस केली. तसेच यासंबंधीचे कागदपत्र मागितले. कार चालक ते देऊ शकला नाही. पथकाने गाडी व पैसे जप्त केले असून ते देवलापार येथे ठेवले आहे. कार चालकाच्या सांगण्यानुसार तो सुपारी व्यापारी असून त्याचेच ते पैसे आहे. त्याला शुक्रवार सकाळपर्यंत यासंबंधीचे कागदपत्र सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. तो या पैशासंबंधी कागदपत्र उद्यापर्यंत सादर करू शकला तर ठिक अन्यथा पुढील कारवाई केली जाणार आहे, असेही कट्यारे यांनी स्पष्ट केले.