लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जय श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील ७९.५४ कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी विठ्ठल दामूजी मेहर (वय ५९) याला अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री अटक केली. सोसायटीचे अध्यक्ष खेमचंद सीताराम मेहरकुरे तसेच संचालक मंडळातील पदाधिकारी आणि साथीदारांनी ठेवीदारांनी गुंतविलेल्या २८ कोटी, ९९ लाख, ७५ हजारांच्या ठेवीसह सोसायटीतील एकूण ७९ कोटी, ५४ लाख, २६,९६३ रुपयांची अफरातफर केली होती. याप्रकरणी जुलै २०१९ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेतर्फे कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गेल्या पावणेदोन वर्षात संस्थाध्यक्ष खेमचंद मेहेरकुरे, अभिषेक खेमचंद मेहरकुरे, सुनीता केशवराव पोळ, विजय माधवराव चिकटे, अर्चना गोपाल टेके, योगेश मनोहर चरडे, अंकुश अनिलराव कावरे, अशोक बालाजी दुरबुडे या आठ आरोपींना यापूर्वीच अटक केली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. फरार असलेल्या चार आरोपींपैकी विठ्ठल मेहर (रा. भंडारा रोड, पारडी) याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. त्याला आज न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्याचा ३ मेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळवला. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीना जगताप या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
१५ कोटी हडपले
घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आणि सोसायटीचा अध्यक्ष खेमचंद मेहेरकुरे याचा आरोपी विठ्ठल मेहर हा एकदम खास होता. त्यामुळे मेहरकुरेने मेहरच्या नावे सुमारे १५ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. ही संपूर्ण रक्कम मेहरने हडप केली आहे.
पोलिसांचे आवाहन
या प्रकरणात पोलिसांनी आतापावेतो आरोपिंशी संबंधित सुमारे २२ कोटी रुपयांची मालमत्ता सलग्न केली आहे. घोटाळ्याच्या संबंधाने गुंतवणूकदार अथवा कोणतेही नागरिकाची काही तक्रार असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी केले आहे.