लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदेशी करंसी ‘डॉलर’चे आमिष देऊन कथित गारमेंट एक्सपोर्ट डीलर आरोपी ट्रॅव्हल्स एजन्सी संचालकाचे रोख आठ लाख रुपये फेऊन फरार झाला. चंदू (४३) रा. हैदराबाद, आंध्रप्रदेश असे आरोपीचे नाव आहे.फिर्यादी अंकुश महेश गोवर (३०) रा. पुरोहित ले-आऊट अंबाझरी हा आहे. अंकुश हा ट्रॅव्हल्स कंपनीचा संचालक आहे. आरोपी चंदू काही दिवसांपूर्वी अंकुशच्या कार्यालयात आला. त्याने अंकुशला १२ हजार रुपये डॉलर दाखवून त्याला भारतीय रुपयाची आवश्यकता असल्याचे सांगितले. यानंतर २६ एप्रिल रोजी आरोपी पुन्हा अंकुशला येऊन भेटला. भारतीय रुपयाच्या मोबदल्यात डॉलर देण्याचे आमिष दाखवले. त्याने अंकुशला आपला मोबाईल नंबर दिला आणि हॉटेल प्राईडमध्ये येऊन भेटण्यास सांगितले. अंकुश ७ लाख ९४ हजार रुपयाची रोख रक्कम घेऊन चंदूला भेटण्यासाठी हॉटेलच्या खोलीत गेला. तिथे चंदूने डॉलर देण्यापूर्वी अंकुशकडून रोख रक्कम घेतली आणि काही वेळ वाट पाहण्यास सांगितले. अंकुश खोलीत त्याची वाट पाहत होता. या दरम्यान चंदू हॉटेलची खोली सोडून पळून गेला. १५ मिनिट वाट पाहिल्यानंतर अंकुशने चंदूच्या मोबाईलवर संपर्क साधला तेव्हा त्याचा फोन स्वीच ऑफ येत होता. अंकुशने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना विचारणा केली तेव्हा आरोपी रुम खाली करून निघून गेल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अंकुशने सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सोनेगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.