नागपूर : सर्दी, खोकला, ताप या लक्षणांच्या ‘एच३एन२’ विषाणूने चिंता वाढवली असताना आठवड्याभरात पहिल्यांदाच कोरोनाचा ८ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. डॉक्टरांनी पुन्हा एकदा सहव्याधी असणारे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि उपचारांमुळे इम्युनिटी कमी झालेले रुग्णांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
नागपूर शहर व ग्रामीणमध्ये जून २०२२ पर्यंत रोज पाचवर रुग्ण आढळून यायचे. परंतु जुलै २०२२ पासून रुग्ण संख्या कमी व्हायला लागली. आठवड्यातून एक-दोन रुग्ण दिसून येत होते. फेब्रुवारी २०२३ मध्ये शहरात ६, तर ग्रामीणमध्ये ३ असे एकूण ९ रुग्णांची नोंद झाली. १ ते ५ मार्च या दरम्यान केवळ १ रुग्ण असताना ६ ते १२ मार्च या कालावधीत ८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ६ तर ग्रामीण भागातील २ रुग्ण आहेत. सर्व रुग्ण गृह विलगीकरणात असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, भारतात २४ तासांत कोरोनाचे ५२४ नवे प्रकरणे नोंदली गेली. मागील ११३ दिवसांतील ही सर्वाधिक वाढ आहे.