नागपूर : रेल्वे लाईन शेजारी राहणाऱ्या व्यक्तींना वारंवार धोक्याचे ईशारे देऊनही त्यांच्याकडून होणारा हलगर्जीपणा कमी व्हायला तयार नाही. तो सारखा वाढतच असल्याने अवघ्या एका आठवड्यात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात रेल्वेने कटून ८ व्यक्ती तसेच १७ गुरांचा मृत्यू झाला. आज या संबंधाने अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती जाहिर झाल्यानंतर समाजमन चिंतीत झाले आहे.
रेल्वे रुळाशेजारी राहणाऱ्या व्यक्तींनी, शेतात काम करणाऱ्यांनी आणि खासकरून गुराख्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येते. त्यांना या संबंधाने जागरूक ठेवण्यासाठी जनजागरण मोहिमही राबविण्यात येते. मात्र, त्याचा फारसा परिणाम संबंधित मंडळीवर होताना दिसत नाही.दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे कार्यक्षेत्र १२०० किलोमिटरमध्ये विस्तारले आहे. ते महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यात विभागले गेले आहे. या क्षेत्रातील बरीचशी रेल्वेलाईन गावाजवळून, शेतातून जाते. ठिकठिकाणचे मंडळी सुरक्षित राहावे, धावत्या रेल्वेगाडीच्या त्यांनी संपर्कात येऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. जनजागरणही केले जाते आणि कारवाईचा ईशाराही दिला जातो. मात्र, अनेकजण त्याला जुमानत नाही. खासकरून शेतात गुरे चारणारी मंडळी गुरांसोबत स्वत:चाही जीव धोक्यात घालताना दिसतात. ३ ते ९ जून या कालावधीत दपूम रेल्वेच्या कार्यक्षात वेगवेगळ्या ठिकाणी धावत्या रेल्वेगाडीसमोर आल्याने ८ व्यक्तींचा तसेच १७ गुरांचा मृत्यू झाला.
व्यक्तींचे अपघाती मृत्यू होण्याच्या घटना नागभिड परिसरात १, भंडारा २, गोंदिया १, राजनांदगाव २ आणि नैनपूर परिसरात २ ठिकाणी घडल्या. त्याचप्रमाणे रेल्वेच्या समोर येऊन भंडारा १, नागभिड २, डोंगरगड ३, राजनांदगाव ४ आणि सर्वाधिक ७ गुरांच्या मृत्यूच्या घटना नैनपूर परिसरात घडल्या. अशा प्रकारे ८ व्यक्ती आणि १७ गुरांचा मृत्यू झाल्याच्या घटनांनी दपूम रेल्वे प्रशासनालाही हादरा बसला आहे.
विशेष मोहिम सुरू : आरपीएफ आयुक्त आर्य
या सर्व घटनांची आम्ही गंभीर दखल घेतली असून, अशा घटना कधीच घडू नये, असा आमचा प्रयत्न असतो. त्यासाठी आम्ही वारंवार पोस्टर, पॉम्पलेट, बॅनर लावून रुळाशेजारच्या वस्तीमध्ये जनजागरण करतो, अशी माहिती आरपीएफचे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. आता ही मोहिम अधिक प्रभावी करण्यासाठी गावोगावचे सरपंच, ग्रामीण नागरिकांना त्यात सहभागी करून घेत आहोत. ज्या व्यक्ती हलगर्जीपणा करतात, त्यांच्यावर कडक कारवाईसुद्धा करण्यात येते. आम्ही आता चार व्यक्तींविरुद्ध कारवाई केल्याचेही आर्य यांनी सांगितले.