सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्मचाऱ्यांकडून मनोरुग्णांची रोज व्यवस्थित आंघोळ घालणे, स्वच्छ कपडे घालायला देणे, आठवड्यातून एकदातरी पलंगपोस (बेडशीट) बदलणे, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे, ही रुग्णालय प्रशासनाची जबाबदारी. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात खरुजची लागण झाली आहे. सुमारे ८० टक्के रुग्ण या रोगाने ग्रासले आहेत. ‘वेड्यांकडे काय लक्ष द्यावे’, याच भावनेतून रुग्णालयाचे कामकाज चालत असल्याचे हे बोलके उदाहरण आहे. मनोरुग्णांवर योग्य औषधोपचार करून त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता यावे यासाठी इंग्रजांनी महाराष्ट्रात चार मनोरुग्णालयांची स्थापना केली. मात्र सरकारी अनास्थेमुळे या रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. दररोजच्या ताणतणावांमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. सद्यस्थितीत मनोरुग्णालयात स्त्री आणि पुरुष मिळून ६००वर रुग्ण आहेत. मात्र, मनोरुग्णालयाची जुनाट सोर्इंवरच आजही भिस्त असल्याने व शासन आवश्यक सोई उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे.
रोगामुळे वाढला रुग्णांमध्ये चिडचिडेपणामहिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये खरुज झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. अनेक रुग्णांच्या बोटांमध्ये, मनगट, कोपर, बगलेचा भाग, नाभी, मांड्या आदी ठिकाणी खरुज झाली आहे. वारंवार खाजवल्यामुळे त्या फुटून जखमा झालेले, पू येणारे रुग्णही दिसतात. या रोगामुळे रुग्णांमध्ये चिडचिडेपणाही वाढल्याचे कर्मचारी सांगतात.
स्क्रब टायफसचीही भीतीरुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत व झुडूप वाढलेले आहे. अनेक रुग्ण या गवतात अनवाणी पायाने चालतात, लोळतात, झुडूपात जातात. यामुळे खरुज होत आहे. सोबतच स्क्रब टायफस होण्याचीही भीती आहे. विशेष म्हणजे, गवत कापण्याचे कंत्राट देण्यात आले असून कंत्राटदाराचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे.
घाणीचे कपडेही बदलवित नाहीअनेक रुग्ण कपड्यातच घाण करतात, परंतु त्यानंतरही त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नाही. विशेष म्हणजे, पूर्वी सफाई कर्मचारी अशा रुग्णांची स्वच्छता करून द्यायचे. आता सफाईचे कंत्राट बदलल्याने याकडे दुर्लक्ष होत आहे. रुग्णांचे कपडे धुण्याचे काम एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. नियमानुसार कंत्राटदाराने गरम पाण्यात उकळून, स्वच्छ धुवून देणे आवश्यक आहे. मात्र, कंत्राटदार या नियमाला हरताळ फासत असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. धुवून आलेले कपडे अस्वच्छच राहत असल्याने त्वचारोगासारखे आजार वाढले आहेत.
स्वच्छतेच्या अभावामुळे पसरतोय आजारसंसर्गजन्य आजारांपैकी एक महत्त्वाचा आजार म्हणजे खरुज. ‘सारकॉप्टिस’ या परजीवी किड्यामुळे हा आजार होतो. याला मुख्यत: कारण ठरते अस्वच्छता. प्रादेशिक मनोरुग्णालयात स्वच्छता नावालाच आहे. मनोरुग्णांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असताना त्याकडे झालेले दुर्लक्ष आता समोर येत आहे. मनोरुग्णांना स्वत:हून नीट अंघोळ करता येत नाही. त्यांच्या अंघोळीची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची आहे. परंतु ही जबाबदारी घ्यायला कुणीच नाही. अनेक रुग्ण आठवड्यातून एक-दोनदाच अंघोळ करत असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.
१०-२० टक्केच रुग्णांना खरुजमनोरुग्णालयात खरुजची साथ नाही. मात्र १०-२० टक्केच रुग्णांना खरुज झाली असून उपचार सुरू आहेत. कपड्यात घाण केलेल्या रुग्णांना आंघोळ घालून देण्याची सूचना नुकतीच सफाई कर्मचाऱ्यांच्या कंत्राटदाराला देण्यात आली आहे. रुग्णांचे कपडे एक दिवसाआड तर बेडशीट आठवड्यानंतर बदलविली जाते. परिसरातील गवत व झुडूपही कापण्याच्या सूचना दिल्या आहेत.-डॉ. आर.एस. फारुखीवैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरु ग्णालय