नागपूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा या पंधरवड्यात होण्याची दाट शक्यता असून महायुती तसेच महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत सस्पेन्स कायमच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीमधील घटकपक्षांमध्ये आतापर्यंत झालेल्या चर्चेनंतर ८० टक्के जागावाटप निश्चित करण्यात आले आहे. भाजपकडून २०१९ प्रमाणेच जवळपास १६० जागा लढविण्याचा आग्रह धरण्यात येत असून जवळपास तेवढे उमेदवार रिंगणात उतरविण्यात येतील.
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. काही जागांवर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या चर्चांनुसार भाजपच सर्वाधिक जागा लढविणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. २०१९ मध्ये भाजपने १६४ जागा लढविल्या होत्या. यावेळीदेखील त्याच्या जवळपासच जागा लढविण्याची तयारी करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना तिकीट मिळू शकते त्यांना त्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत.
१० ते २० नोव्हेंबरदरम्यान निवडणूकदरम्यान, राज्यात विधानसभा निवडणूक कधी होणार याबाबत विविध कयास लावण्यात येत आहेत. भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये नवीन सरकार २८ नोव्हेंबरअगोदर स्थापन होणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणुकीचे सर्व टप्पे हे १० ते २० नोव्हेंबरदरम्यान होतील. यावेळी निवडणूक जाहीर झाल्यावर लगेच उमेदवारांची नावे जाहीर करण्यावर भाजपचा भर राहणार आहे.