नागपूर: महायुतीची दिल्ली मधील बैठक सकारात्मक झालेली आहे. एकाच बैठकीत सगळे निर्णय होतील अशी परिस्थिती नाही. ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. २० टक्के काम राहिले आहे. लवकरच हे विषय पूर्ण करू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
फडणवीस म्हणाले, मनसेने घेतलेली व्यापक भूमिका आमच्याशी विसंगत नाही आहे. त्यामुळे क्षेत्रीय अस्मिता आम्हाला मान्य आहे. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाचे मुद्दे मांडले पाहिजे. सोबतच व्यापक भूमिका असावी असे आमचे मत होते. आज हिंदुत्वाची भूमिका मनसेने घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या व आमच्या भूमिकेत फार काही अंतर राहीलेले नाही. बाकी निवडणूकीत काय करायचे या गोष्टी तपशील व चर्चेच्या असतात. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय होऊ शकतात. ॲड. प्रकाश आंबेडकर हे कुणा बद्दल काय बोलतात, यावर मी काय बोलणार, त्यांना आमच्या शुभेच्छा असे म्हणत त्यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले.
वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट पैसेकंत्राटी वीज कर्मचारी आहेत त्याच्या प्रश्नावर चर्चा झाली. त्यामध्ये काही त्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. एक विशेष महत्वाची मागणी आहे की कंत्राटदार आहेत जे फसववणूक करतात. ती होऊ नये यासाठी त्याचा खात्यात सरळ पैसे जमा होतील. कंत्राटी कामगाराबद्दल सरकारचा दृष्टिकोन सकारात्मक असणार आहे. पण हिंसाचार कधीही मान्य केला जाणार नाही. न्याय पद्धतीने त्यांनी आपल्या मागण्या मांडाव्या, असे फडणवीस म्हणाले.