अन्न व औषध प्रशासन विभाग : कमी दर्जाचे आईस्क्रीम नागपूर : कमी दर्जाच्या दोन आईस्क्रीम नमुने आढळून आल्याबद्दल अन्न व औषध प्रशासन विभागाने भोपाळ येथील रमानी आईस्क्रीम कंपनीला ८० हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्धा येथील स्वामी समर्थ सेल्स या प्रतिष्ठानामधून फ्रूट कॉकटेल आईस्क्रीम (टॉप एन टाऊन) व मटका कुल्फी आईसक्रीमच्या (टॉप एन टाऊन) प्रत्येकी एक नमुन्याची तपासणी मुंबई येथील प्रयोगशाळेत करण्यात आली. यामध्ये मानद प्रमाणापेक्षा कमी आढळून आल्याने कमी दर्जाचे घोषित करण्यात आले. ही कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी केली होती. अन्न विश्लेषण चाचणी प्रयोगशाळेमध्ये फ्रूट कॉकटेल आईस्क्रीममध्ये मिल्क फॅटचे प्रमाण १० टक्के या मानद प्रमाणापेक्षा कमी म्हणजे ५.६९ टक्के व मिल्क प्रोटिन ३.५ टक्क्यांऐवजी २.०६ टक्के आढळून आले. मटका कुल्फीमध्ये मिल्क फॅटचे प्रमाण १० टक्के या मानद प्रमाणापेक्षा कमी म्हणजेच ४.३३ टक्के आढळून आल्यामुळे रमानी आईसक्रीम कंपनीविरुद्ध प्रत्येकी ४० हजार रुपये याप्रमाणे ८० हजार रुपयाचा दंड करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद देशपांडे यांनी दिली. विभागातर्फे जून ते जानेवारी २०१७ या कालावधीत १०६ प्रकरणांमध्ये ११ लाख ८४ हजार रुपये दंडाची शिक्षा करण्यात आल्याचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
रमानी आईस्क्रीम कंपनीला ८० हजाराचा दंड
By admin | Published: February 19, 2017 2:45 AM