लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर मेट्राे रेल्वे प्रकल्पाच्या रिच-१ म्हणजे वर्धा राेड आणि रिच-३ म्हणजे हिंगणा राेडवरील ऑरेंज आणि ॲक्वा लाईनवर रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर शहरवासीयांना उर्वरित दाेन लाईनवरील सेवेची प्रतीक्षा आहे. या दाेन्ही काॅरिडाेरचे कामही वेगाने हाेत आहे. मेट्राे पुलांसह उरलेल्या स्टेशनच्या इमारतींचे काम पूर्णत्वास येत आहे. याअंतर्गत रिच-४ म्हणजे सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर निर्माणाधीन डाॅ. आंबेडकर चाैक मेट्राे स्टेशनचे बांधकामही ८० टक्के पूर्ण झाले आहे.
सीए राेडच्या मध्यात असलेले डाॅ. आंबेडकर चाैक मेट्राे स्टेशन वर्दळीच्या ठिकाणी असल्याने नागरिकांना याचा लाभ अधिक हाेण्याची अपेक्षा आहे. स्टेशन परिसरातील शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट परिवहन सेवा मिळणार आहे. स्टेशनच्या जवळच्या परिसरात अनेक सरकारी, निमसरकारी कार्यालये, मंदिर, सभागृह, बँका असल्यानेही मेट्राे सेवा सुरू हाेताच नागरिकांना फायदा मिळेल आणि हे स्टेशन प्रमुख स्टेशन म्हणून ओळखले जाईल.
डाॅ. आंबेडकर चाैक मेट्राे स्टेशनचे बांधकाम १७८७ वर्गमीटरमध्ये विस्तारलेले आहे. लांबी ८१.२५ मीटर तर रुंदी २२ मीटर आहे. स्टेशनच्या दाेन्ही बाजूंना प्रवेश आणि निकासीची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्राऊंड लेव्हल, काॅनकाेर्स लेव्हल आणि प्लॅटफार्म असे तीन माळे आहेत. दुसऱ्या माळ्यावरील काॅनकाेर्स लेव्हलवर तिकीट काऊंटर व कन्ट्राेल रुम असेल. काॅनकाेर्स लेव्हलवर फ्लाेरिंग लिफ्ट शाफ्ट, एससीआर, टाॅम, एस्केलेटर ही कार्यालये असतील. स्टेशनवर दाेन लिफ्ट, दाेन एस्केलेटर तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी रॅम्पची सुविधा करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वाॅटर हार्वेस्टिंग व बाॅयाे-डायजेस्टरचीही व्यवस्था करण्यात येत आहे.