आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यातील सर्व रुग्णालयांच्या तपासणीची धडक मोहीम १५ मार्च ते ३१ मे २०१७ या कालावधीत राबविण्यात आली. त्यामध्ये ३७ हजार ६८ रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. पैकी ६७४२ रुग्णालयांमध्ये कायद्यातील तरतुदीनुसार त्रुटी आढळून आल्या आहेत. या तपासणीमध्ये ८१ बोगस डॉक्टर आढळून आले असून त्यापैकी २० डॉक्टरांवर एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.विधानसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांनी राज्यातील रुग्णालयांच्या तपासणी मोहिमेबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे की, ३७ हजार ६८ रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६७४२ रुग्णालयांमध्ये कायदेशीर त्रुटी आढळून आल्या. २०८४ वैद्यकीय संस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायद्याचे पालन न केल्याचे आढळून आले आहे. या मोहिमेत पथकाने केलेल्या तपासणीत ८१ बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. त्यापैकी २० डॉक्टरांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पथकाने तपासणीमध्ये आढळलेल्या त्रुटी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीसमोर मांडल्या आहेत.या मोहिमेंतर्गत १६९ वैद्यकीय संस्थांना दंड करण्यात आला आहे. २७ दवाखाने बंद करण्यात आले आहेत. वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ चे उल्लंघन झाल्याचे आढळून आले असून त्यामुळे चार केंद्र बंद करण्यात आले आहे. पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे पाच सोनोग्राफी मशीन सील करण्यात आल्या आहेत.