लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यात दरवर्षी भीषण पाणीटंचाई जाणवते. पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून दरवर्षी जिल्हा परिषदेमार्फत टंचाई आराखडा तयार करण्यात येतो.यंदा ३१ कोटी रुपयांच्या टंचाई आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. यात सर्वाधिक कामे ही बोअरवेलची आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात आतापर्यंत ८,६०० बोअरवेल तयार करण्यात आल्या आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या नोंदीत ८३५ बोअरवेल निकामी ( निर्लेखित) झाल्या आहेत.जिल्ह्यातील ७६८ ग्रा.पं.अंतर्गत १५६० वर गावे आहेत. जर अशा परिस्थितीत प्रति गावाचा विचार केल्यास किमान पाच ते सहा बोअरवेल प्रत्येक गावांमध्ये आहेत. याशिवाय पाणीपुरवठ्याचे इतरही स्रोत उपलब्ध आहेत. ज्यामध्ये नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा, विहीर, टँकरद्वारे पाणीपुरवठा आदींचा समावेश आहे. नवीन बोअरवेल खोदल्यामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत आहे. गतवर्षी जि.प.ने जवळपास ६९५ बोअरवेल खोदल्या होत्या.यंदाच्या टंचाई आराखड्यात पुन्हा ३ कोटी ४१ हजाराच्या निधीतून आणखी २६४ बोअरवेल खोदण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. बोअरवेलचा अतिरेक झाल्यामुळे भूगर्भातील पाणी खोल गेले आहे. नरखेड, काटोल तालुक्यांमध्ये त्याची झळ बसत आहे. त्यामुळे बोअरवेलला फ्लशिंग हा पर्याय समोर आला आहे. निर्लेखित बोअरवेलला पुनर्भरणाच्या दृष्टीने फ्लशिंग करून बोअरमधील गाळ, कचरा साफ करून बोअरवेलचे पुनर्भरण केल्यास जमिनीतील पाण्याचा उपसा मर्यादित राहणार आहे.कळमेश्वर तालुक्यात फ्लशिंगचा प्रयोग यशस्वीगतवर्षी जिल्ह्यातील कळमेश्वर, नरखेड व काटोल ही तालुके दुष्काळग्रस्त होती. त्यावेळी कळमेश्वर तालुक्यामधील जवळपास ४० वर गावांमध्ये सीएसआर फंडातून फ्लशिंगचा कार्यक्रम राबविण्यात आला आणि तो यशस्वीही ठरला. यामध्ये गोंडखैरी, घोराड, धापेवाडा, सिंधी आदी गावांचा समावेश होता. तर हिंगणा व मौदा तालुक्यातीलही १८-२० गावांनी जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे फ्लशिंगसंदर्भात प्रस्ताव सादर केला होता.बोअरवेल फ्लशिंगसाठी पुढाकार का नाही?जिल्ह्यात गावांच्या तुलनेत सहापटीने बोअरवेल जास्त आहेत. नवीन बोअरवेल खोदून भूगर्भाची चाळण होत आहे. या परिस्थितीत बोअरवेल फ्लशिंगसारख्या कार्यक्रमाला गंभीरतेने घेण्याची गरज आहे. परंतु बोअरवेलमुळे राजकारण्यांना आपली राजकीय पोळी शेकता येते, यामुळे ते जाणीवपूर्वक या फ्लशिंगसारख्या कमी खर्चाच्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे वास्तव आहे.
नागपूर जिल्ह्यात ८३५ बोअरवेल निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 1:27 PM
यंदा ३१ कोटी रुपयांच्या टंचाई आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८,६०० बोअरवेल तयार करण्यात आल्या आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या नोंदीत ८३५ बोअरवेल निकामी ( निर्लेखित) झाल्या आहेत.
ठळक मुद्देनव्या बोअरवेलसाठी आग्रह जिल्ह्याचा ३१ कोटीचा टंचाई आराखडा