नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) दक्षता विभागाला प्राप्त माहितीच्या आधारे कळमना आणि कामठी तालुक्यातील लिहिगाव येथे छापे टाकून ३ कोटी १६ लाख ८४ हजार ९२४ रुपये किमतीची ८४,५२७ किलो खाण्यास असुरक्षित आणि कमी दर्जाच्या सडक्या सुपारीचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे सुपारी व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विभागाची कारवाई अद्याप सुरूच आहे. ही धडक मोहीम विभागातर्फे निरंतर सुरू राहणार आहे.
प्रशासनास प्राप्त होत असलेल्या सुपारी संदर्भातील तक्रारींच्या आधारे ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुचनेनुसार अन्न सुरक्षा आयुक्त, मुंबईचे अभिमून्य काळे यांच्या आदेशानुसार आणि सहआयुक्त (दक्षता) समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळमना, नागपूर येथील प्रीती इंडस्ट्रीज येथे एकूण ५६ लाख १९ हजार ९०० रुपये किमतीची ११,७२७ सडकी सुपारी जप्त केली. तसेच कामठी तालुक्यातील लिहिगांव येथील फार्मको कोल्ड चेन अॅन्ड लॉजिस्टिक लि. या कोल्ड स्टोरेजमध्ये विनस ट्रेडर्स, आर. आर. ब्रदर्स, टी. एम. इंटरप्राइजेस, इमरान सुपारी ट्रेडर्स या इतवारीतील चार फर्मची २ कोटी ६० लाख ६५ हजार २४ रुपये किमतीची ७२,८१० किलो निकृष्ट दर्जाची सुपारी जप्त करण्यात आली.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन दक्षता विभागाचे सहाय्यक आयुक्त आनंद महाजन, अन्न सुरक्षा अधिकारी यदूराज दहातोंडे, राजेश यादव, संदीप सूर्यवंशी आणि नागपूर कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी पीयूष मानवतकर, स्मिता बाभरे, अमर सोनटक्के व ललित सोयाम यांनी केली. ही धडक मोहीम नागपूर जिल्ह्यात विविध भागात राबविण्यात येणार आहे.