लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इक्विटीच्या नावाखाली एका व्यापाऱ्याचे पाच आरोपींनी ८५ लाख रुपये हडपले. जून २०१८ पासून सुरू असलेल्या या फसवणूक प्रकरणात अजनी पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला.
परेश गोविंददास पटेल (वय ५७) असे पीडित व्यापाऱ्यांचे नाव असून ते गुजरातमधील कपलगंज येथील रहिवासी आहेत.
नागपुरात कोल्डस्टोरेजचे काम करायचे असल्यामुळे त्यांना पैशाची आवश्यकता होती. शब्बीर भाई नामक आरोपीची त्यांच्यासोबत २०१८ मध्ये ओळख झाली. त्याने नागपुरात इक्विटी देणारे एजंट राहतात, असे सांगितले. त्यावरून १५ जून २०१८ ला सकाळी ११ वाजता अजनीतील हनुमान नगरात मुकेश ताराचंद गांधी (वय ४८, रा. भगवतीनगर), प्रमोद ऊर्फ पप्पू कृष्णकुमार अवस्थी (रा. जगनाडे चौक), सुलतान भाई (मुंबई) आणि मेहंदीसिंग सत्तासिंग (रा. मुंबई) या चौघांची आरोपी शब्बीरने भेट घालून दिली. या सर्वांनी इक्विटी मिळवून देण्यासाठी एक कोटी रुपये खर्च करावे लागतील, असे सांगितले. बदल्यात तीन टक्के कमिशन द्यावे लागेल, असेही सांगितले. त्यानंतर अहमदाबादचे पथक नागपुरात येऊन असेसमेंट करून देतील. त्याचा खर्च ६० लाख रुपये होईल, असेही म्हटले. हे ६० लाख रुपये आणि नंतर २५ लाख असे ८५ लाख रुपये उपरोक्त पाच आरोपींनी घेतले. मात्र इक्विटी मिळवून दिली नाही.
ते बनवाबनवी करीत असल्याचे ध्यानात आल्यामुळे पटेल यांनी आपली रक्कम परत मागितली असता आरोपींनी ५ ऑगस्ट २०१८ ला पटेल यांना पिस्तुलाचा धाक दाखवून शिवीगाळ केली आणि धमकीही दिली. वारंवार रक्कम मागूनही आरोपी परत करत नसल्यामुळे अखेर पटेल यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर या प्रकरणात बुधवारी फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.