नागपूर : मॅन्यूअल स्कॅव्हेंजिंग कायदा २०१३ नुसार मनुष्यबळाचा वापर करून गडरचे चेंबर साफ करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील गजबजलेल्या व दाट वस्तीतील सीवर चेंबरची स्वच्छता महापालिकेसाठी चांगलीच डोकेदु:खी ठरत होती. स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या अत्याधूनिक रोबोटचा आधार मिळाल्याने या रोबोट मशीनद्वारे ११ महिन्यात महापालिकेच्या १० झोनमध्ये ८५७८ सीवर चेंबर स्वच्छ करण्यात आले आहे.
नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी रोबोट मशीनद्वारे सीवर चेंबरच्या स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रोबोटिक स्कॅवेंजर मशीन हाताळणारे प्रमुख आणि इतर कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग कायदा २०१३ च्यानुसार मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगवर बंदी घातल्यामुळे लहान रोडवर सीवर चेंबरची स्वच्छता करणे अडचणीचे ठरत होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रोबोटद्वारे स्वच्छता करण्यात येत आहे. रोबोट लहान रस्त्यावर किंवा गल्ल्यांमध्ये सुद्धा सीवर चेंबरच्या स्वच्छता करीत आहे.
- शहरात ३ बैंडिकूट रोबोट
नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे केरळ येथील जेनोरोबोटिक्स कंपनी कडून ३ बैंडिकूट रोबोट भाडेतत्वावर घेण्यात आले आहेत. या मशीन नागपूर महापालिकेला सीवर चेंबरची स्वच्छता करण्यासाठी देण्यात आल्या आहेत. रोबोटद्वारे मॅनहोल्समधून काढलेला कचरा एका प्लेटच्या साहाय्याने मशीनमध्ये टाकता येतो. त्यासाठी कामगारांना कचरा, मलब्याला हात लावण्याची गरज पडणार नाही, कोणाला मेनहोलमध्ये उतरण्याची सुद्धा गरज नाही.
- रोबोटला कॅमेरा व हात
शहरातील मॅनहोल्सच्या स्वच्छता आणि देखभालीसाठी घेण्यात आलेल्या विद्युत रोबोटला कॅमेरा व यांत्रिकी हात आहेत. रोबोट साधारणतः १० मीटर खोल जाऊन मॅनहोल स्वच्छ करू शकतो. स्वच्छ भारत मिशन २.० मध्ये केंद्र शासनाने मॅनहोलच्या स्वच्छतेसाठी मनुष्य ऐवजी मशीनचा वापर करण्याचा संकल्प केला आहे.