नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात होऊन ११ महिन्यांचा कालावधी झाला आहे. या दरम्यान एकट्या मेडिकलमध्ये ३१ जानेवारीपर्यंत ८,५८२ बाधित व १,६३७ मृत्यूची नोंद झाली. सर्वाधिक २,५३६ रुग्ण ऑगस्ट महिन्यात भरती झाले, तर सर्वात जास्त ५५३ रुग्णांचे मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाले. सध्या रुग्ण व मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु मेडिकलचा औषधवैद्यकशास्त्र विभागात कोरोना विरुद्धचा लढा सुरूच आहे.
नागपुरात कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद ११ मार्च रोजी झाली. याच महिन्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ६ रुग्ण दाखल झाले. नवा आजार व खात्रीलायक औषधोपचार नसतानाही युद्धातील आघाडीच्या सैनिकांसारखी मेडिकलचे डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत सेवा दिली. एखाद्या लढाईत आघाडीवरचा सैनिक जसे झोकून देत नेटाने बाजी लढवत असतो, तसे अजूनही धीराने कोरोना विरुद्ध ते लढत आहेत. सध्या रुग्णसंख्या कमी असल्याने व कोरोना प्रतिबंधक लस आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु धोका कायम आहे.
-असे वाढले रुग्ण व मृत्यू
मेडिकलमध्ये कोरोनाच्या ६ रुग्णांपासून सुरुवात झाली असली तरी एप्रिल महिन्यात ६८ रुग्ण दाखल झाले. मे महिन्यात २०३ रुग्ण व ४ मृत्यूची नोंद झाल्याने खळबळ उडाली. जून महिन्यात रुग्ण व मृत्यूच्या संख्येत दुपटीने वाढ झाली. ४१५ रुग्ण व ९ मृत्यू झाले. जुलै महिन्यात तर तीन पटीने वाढ झाली. १,३४८ रुग्ण व ४९ रुग्णांचे बळी गेले. मेडिकलसाठी ऑगस्ट व सप्टेंबर महिना कठीण राहिला. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक २,५३६ रुग्ण व ४६७ रुग्णांचे बळी गेले. कोविड रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या खाटाही या महिन्यात फुल्ल होत्या. सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्येत किंचित घट आली. १,७०५ रुग्णांची नोंद झाली. परंतु, याच महिन्यात ५५३ रुग्णांचे मृत्यू झाले. ऑक्टोबर महिन्यापासून रुग्ण व मृत्यूची संख्या ओसरू लागली. ८६५ रुग्ण व २३३ मृत्यूची नोंद झाली. नोव्हेंबर महिन्यात ही संख्या आणखी कमी होऊन ६७९ रुग्ण व १४८ मृत्यूवर स्थिरावली. डिसेंबर महिन्यात ४७२ रुग्ण व ९९ रुग्णांचे बळी गेले. जानेवारी महिन्यात रुग्णसंख्या अर्ध्यावर येऊन २८५ रुग्ण ७५ मृत्यूची नोंद झाली.
- रुग्णसंख्येच्या तुलनेत १९ टक्के मृत्यू
मेडिकलमध्ये आतापर्यंत रुग्णसंख्येच्या तुलनेत १९ टक्के मृत्यू झाले आहेत. यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे उपचारात उशीर. मेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले, कोरोना होऊन चार - पाच दिवसानंतर प्रकृती गंभीर झाल्यावर मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या मृत्यूची संख्या मोठी आहे. याशिवाय, अनियंत्रित मधुमेह, रक्तदाब व श्वसनाचा विकार असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. खासगी रुग्णालयातून गंभीर स्थितीत उपचाराासाठी येणाऱ्या रुग्णांमध्येही मृत्यूची संख्या जास्त आहे.
-मेडिकलमधील कोरोनाची स्थिती
महिनारुग्णमृत्यू
मार्च ०६ ००
एप्रिल ६८ ००
मे २०३ ०४
जून ४१५ ०९
जुलै १३४८ ४९
ऑगस्ट २५३६ ४६७
सप्टेंबर १७०५ ५५३
ऑक्टोबर ८६५ २३३
नोव्हेंबर ६७९ १४८
डिसेंबर ४७२ ९९
जानेवारी २८५ ७५