लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्यानागपूरमेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे ७५ टक्के बांधकाम झाले आहे. नागपूरची वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतुकीच्या आवश्यकतेचा विचार करून मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने ४८.२९ कि़मी.च्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे नागपुरात मेट्रोचे जाळे ८६ कि़मी.पर्यंत विस्तारले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प मार्गी लागला आहे.एकूण गुंतवणूक १९,८९६ कोटी,८६ कि़मी., ७३ स्टेशनमहामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित मंगळवारी पत्रपरिषदेत म्हणाले, मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे नागपूरच्या आर्थिक विकासात भर पडणार आहे. दुसरा टप्पा ११,२१६ कोटींचा असून, पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्यापूर्वीच दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होणार आहे. पहिला टप्पा ८,६८० कोटींचा आहे. त्यामुळे दोन्ही टप्प्यातील गुंतवणूक १९,८९६ कोटींची असणार आहे. दोन्ही टप्पे ८६ कि़मी. लांबीचे असून, त्यात ७३ स्टेशन राहतील. कन्हान ते बुटीबोरी या ५२ कि़मी.च्या मार्गामुळे लोकांची वाहतुकीची जोखीम, पैसा आणि वेळेची बचत होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जमिनीचे अधिग्रहण अल्पसे असल्यामुळे बांधकाम वेळेत पूर्ण होईल, असे दीक्षित यांनी स्पष्ट केले. दुसरा टप्पा सोलरवर राहणार असून, महावितरणच्या ९.५ रुपये प्रति युनिटच्या तुलनेत सोलरची वीज ३.५ रुपये युनिट दरात मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होईल.२०२४ पर्यंत ५.५ लाख प्रवासीमहामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे पहिल्या टप्प्यात २.६ लाख आणि दुसऱ्या टप्प्यात २.९ लाख असे एकूण ५.५ लाख प्रवासी २०२४ पर्यंत दररोज मेट्रोतून प्रवास करतील. ही संख्या २०३१ पर्यंत पहिल्या टप्प्यात २.९ लाख, दुसऱ्या टप्प्यात ३.४ लाख असे एकूण ६.३ लाख प्रवासी आणि २०४१ पर्यंत पहिला टप्पा ३.७ लाख, दुसरा टप्पा ४.१ असे एकूण दररोज ७.७ लाख प्रवासी मेट्रोतून प्रवास करतील.खासगी कंपन्यांसह करार होणारऑटोमोटिव्ह स्टेशन आणि शंकरनगर स्टेशनवर खासगी कंपन्यांसोबत व्यावसायिक करार होणार आहे. बर्डी स्टेशन लॅण्डमार्क बनणार आहे. झिरो माईल्स येथे २० माळ्यांच्या दोन इमारती उभारण्यात येणार आहेत. वर्धा मार्गावर जयप्रकाश स्टेशन इमारत चार माळ्यांची असून, ऑरेंज सिटीवर उभारण्यात येणाऱ्या मनपा मॉलशी जोडण्यात येणार आहे.ब्रॉडगेजचा फिजिकल अहवाल सादरनागपुरातून भंडारा, नरखेड, वर्धा या मार्गावर भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेजवर मेट्रो धावण्यासाठी महामेट्रोने फिजिकल अहवाल राज्य शासनाकडे पाठविला आहे. या प्रकल्पात ३०० कोटींची गुंतवणूक केवळ कोचेस खरेदीवर होणार आहे. या प्रकल्पात सहा कोचेसची एक रेल्वे अशा सहा रेल्वे (४८ कोसेस) लागतील. सकाळी आणि सायंकाळी सोयीच्या वेळेत मेट्रा धावणार असून, नागपूर-वर्धा प्रवास एक तासात पूर्ण होईल. प्रवासी शुल्क मेट्रोचे राहील. यासंदर्भात भारतीय रेल्वेशी करार केल्याचे दीक्षित यांनी सांगितले. याप्रसंगी महामेट्रोचे प्रकल्प संचालक सुनील माथूर आणि महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे उपस्थित होते.
नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्ये
- नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा ४८.३ कि़मी. आणि ३५ स्टेशन.
- ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान १३ कि.मी. लांब, १२ स्टेशन, खसारा, लेखानगर, कामठी, ड्रॅगन पॅलेस, कन्हान नदी, कन्हान स्टेशन.
- मिहान ते बुटीबोरी एमआयडीसी ईएसआर १८.५ कि.मी. लांब, १० स्टेशन, जामठा, डोंगरगाव, मोहगाव, बुटीबोरी, म्हाडा कॉलनी, इंडोरामा कॉलनी.
- प्रजापतीनगर ते हिंगणा ५.६ कि.मी., ३ स्टेशन, अंबेनगर, कापसी, ट्रान्सपोर्टनगर, आसोली.
- लोकमान्यनगर ते हिंगणा ६.७ कि़मी, ७ स्टेशन, नीलडोह, गजानननगर, राजीवनगर, लक्ष्मीनगर, रायपूर, हिंगणा गाव, एमआयडीसी परिसर.
- वासुदेवनगर ते दत्तवाडी ४.५ कि़मी, ३ स्टेशन, एमआयडीसी परिसर, ऑर्डनन्स फॅक्टरी कॉलनी, वाडीसह अमरावती रोड.