लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भावाचा कहर सुरू आहे. रोज १५०० वर नव्या रुग्णांची भर आणि ४० ते ५० रुग्णांच्या मृत्यूने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. मृतांमध्ये ५० वर्षांवरील रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र याही स्थितीत डॉक्टरांच्या प्रयत्नाने व इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनासारख्या विषाणूला परतवून लावू शकतो, हे उपराजधानीतील ८६ वर्षीय व ९५ वर्षीय ज्येष्ठाने सिद्ध करून दाखविले आहे.
नागपूरची पॉश वसाहत म्हणून ओळख असलेल्या बजाजनगर येथील हे आजी, आजोबा आहेत. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आजीला ताप आला. व्हायरल असेल म्हणून सुरुवातीला दुर्लक्ष झाले. परंतु तीन दिवसांनंतरही ताप उतरला नसल्याने आणि अशक्तपणा वाढल्याने कुटुंबातील लोकांनी खासगी लॅबमधून त्यांची चाचणी के ली. तीन दिवसानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तेव्हा काय करावे, हा एकच प्रश्न या कुटुंबासमोर होता. त्यांची मुलगी सुनीता मुदलियार यांनी ‘लोकमत’ला सांगितले, आईचे वय व प्रकृती पाहता अनेक खासगी इस्पितळांनी भरती करण्यास नकार दिला.
एका डॉक्टराच्या मदतीने कामठी येथील एका खासगी इस्पितळात भरती केले, परंतु प्रकृती गंभीर पाहता, दुसºयाच दिवशी मेडिकलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. २४ आॅगस्ट रोजी मेडिकलच्या वॉर्ड क्र.५० मध्ये भरती के ले. आईला मधुमेह, उच्च रक्तदाब हा जुना आजार होता. एक्स-रेमधून न्युमोनिआ असल्याचे निदान झाले. आईला भरती होऊन चार दिवस होत नाही तोच वडिलांना ताप आला. याची माहिती डॉक्टरांना फोनवरून दिल्यावर त्यांनी तातडीने मेडिकलमध्ये भरती करण्यास सांगितले. परंतु वडील मेडिकलमध्ये भरती होण्यास तयार नव्हते, खासगी हॉस्पिटलमध्ये प्रयत्न केल्यावर ९५ वर्र्षे वय असल्याने काहींनी नकार दिला. तर काहींनी अॅडमिशनसाठी महानगरपालिकेचे पत्र व इतरही सोपस्कार करण्यास सांगून टाळाटाळ के ली. यात बराच वेळ गेला. यामुळे अखेर मेडिकलध्येच भरती करण्याचा निर्णय घेतला.
कोविड पॉझिटिव्हसोबतच त्यांनाही न्युमोनिआचे निदान झाले. फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन पसरले होते. परंतु वॉर्डातील डॉक्टरांनी घेतलेली विशेष काळजी, तातडीने सुरू के लेले उपचार यामुळे दहा दिवसांतच आई-वडील बरे झाले. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये दोघांना भरती करताना स्ट्रेचरवर घेऊन जावे लागले होते, परंतु बरे झाल्यानंतर ते स्वत:हून चालत रुग्णालयाबाहेर पडले. शासनाने या रुग्णालयाकडे अधिक लक्ष दिल्यास व सोयी उपलब्ध करून दिल्यास रुग्णांसोबतच डॉक्टरांनाही याचा फायदा होईल.