नागपूर : नागपूर विभागात शिक्षक मतदारसंघात गुरुजींनी बंपर व्होटिंग केले. सरासरी ८५ टक्के मतदान झाले. सर्वच जिल्ह्यांत मतदानाची टक्केवारी वाढल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार व महाविकास आघाडी समर्थित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांच्यात ‘टफ फाइट’ होईल, असे चित्र मतदानाअंती समोर आले आहे.
सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली तेव्हापासूनच शिक्षक मतदारांमध्ये उत्साह होता. दुपारनंतर मतदान केंद्रांवर रांगा लागल्या. काही केंद्रांवर दुपारी ४ नंतरही गर्दी होती. त्यामुळे सर्व मतदारांना आतमध्ये घेऊन पुढे तास- दीड तास मतदान चालले. सर्वाधिक ९१.८९ टक्के मतदान चंद्रपूर जिल्ह्यात झाले. तर १६ हजार ४८० मतदार असलेल्या नागपूर जिल्ह्यातही तब्बल ८१.४३ टक्के मतदान झाले. गडचिरोलीसारख्या मागास, आदिवासी जिल्ह्यातही ९१.५३ टक्के मतदान झाले. सर्वात कमी वर्धा जिल्ह्यात ८६.८२ टक्के मतदान झाले.
जिल्हा - मतदान टक्केवारी
नागपूर : ८१.४३
वर्धा : ८६.८२
चंद्रपूर : ९१.८९
भंडारा : ८९.१५
गोंदिया : ८७.५८
गडचिरोली : ९१.५३
नेते बूथवर, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
- भाजप व काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक चांगलीच मनावर घेतली. दिवसभर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बूथला भेटी दिल्या. काही नेते तर प्रत्यक्ष बूथवर बसले. यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत होता.
अडबालेंच्या दुपट्ट्यावर आक्षेप
- सुधाकर अडबाले हे नागपुरातील मोहता सायन्स मतदान केंद्राला भेट देण्यासाठी पोहचले. त्यावेळी त्यांच्या गळ्यात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा दुपट्टा होता. शिक्षक परिषदेच्या प्रतिनिधीने त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे अडबाले यांनी दुपट्टा काढला.
आम आदमी पक्षाची नाराजी
- पसंतीक्रमाच्या मतदान प्रक्रियेत वेळ लागतो, याची माहिती असूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी काही बूथवर १३९५ पर्यंत मतदार दिले. यामुळे शिक्षक मतदारांना काही केंद्रांवर दीड ते दोन तास रांगेत उभे रहावे लागले. काही शाळा प्रशासनाने जिल्ह्याधिकारी यांच्या सुटीच्या आदेशाला न मानता शाळा-कॉलेज चालू ठेवले. त्यामुळे शिक्षक शाळा करून दुपारी मतदानाला पोहचले व गर्दी झाली. प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे शिक्षकांना मनस्ताप झाला, अशी नाराजी आम आदमी पक्षाने व्यक्त करीत यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.