नागपूर : बॅंकेचे कर्ज काढून देण्याच्या नावाखाली तीन आरोपींनी दोन खातेदारांना ८.६५ लाखांचा गंडा घातला. आरोपींनी बॅक खात्याचे तपशील घेत बॅकेच्याच ॲपच्या माध्यमातून खातेदारांच्या खात्यातील पैसे वळते केले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
निखील मलिक (३०, नारी रोड, कपिलनगर), नागेश पवार (३३, फ्रेंड्स कॉलनी) व अक्षय भारतकर (३०, तहसील) अशी आरोपींची नावे आहेत. धनराज सुदाम कैथल (४३) यांना बॅंकेतून कर्ज काढायचे असल्यामुळे त्यांनी निखीलला संपर्क केला. निखीलने इतर आरोपींसोबत त्यांची ओळख करून दिली. आरोपींनी त्यांना बॅंकेतून कर्ज काढून दिले. त्यावेळी त्यांनी कैथल यांच्या खात्याचे तपशील घेतले होते. त्यानंतर त्यांनी योनो ॲप डाऊनलोड करून त्यांच्या बॅंक खात्यातून सव्वाचार लाख रुपये स्वत:च्या खात्यात वळते केले. ही बाब कैथल यांना कळाल्यावर त्यांनी आरोपींना पैसे परत मागितले. मात्र आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला.
असाच प्रकार किरण संतोष शिर्के (वैशालीनगर) यांच्यासोबतदेखील झाला. त्यांच्या बॅंक खात्यातूनदेखील ४.४० लाख रुपये वळते करण्यात आले. कैथल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलीस ठाण्यात तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांचा शोध सुरू आहे.