लाेकमत न्यूज नेटवर्क
बाजारगाव : विजेच्या तारांचे एकमेकांना घर्षण झाले आणि त्यातून निर्माण झालेल्या शाॅर्टसर्किटमुळे बाजारगाव येथील ५२ नागरिकांच्या घरातील विजेची ८७ विविध उपकरणे व २५० बल्ब निकामी झाले असून, तिघांच्या घरातील इलेक्ट्रिक लाईन पूर्णपणे जळाली. यात एकूण ६ लाख १० हजार रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या नुकसानीची नैतिक जबाबदारी स्वीकारणार काेण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
ग्रामपंचायत सदस्य सुरेश कोल्हे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी त्यांनी रविवारी (दि. ८) सकाळी एमएच-४०/वाय-१९३२ क्रमांकाच्या टिप्परने रेती मागवली. त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता अरुंद असला तरी त्यात रस्त्यावरून टिप्पर घराजवळ नेण्यात आला. रस्त्यावर विजेच्या तारा लाेंबकळलेल्या असल्याने त्यांचा टिप्परला स्पर्श हाेऊ नये म्हणून सुरेश काेल्हे यांचा मुलगा रितिक याने त्या तारा काठीने वर करण्याचा प्रयत्न केला.
या तारांचा एकमेकांना स्पर्श हाेताच शाॅर्टसर्किट झाले आणि क्षणात ५२ नागरिकांच्या घरांमधील विजेची उपकरणे निकामी झाली. या प्रकारामुळे ५२ जणांचे एकूण ६ लाख १० हजार रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याची माहिती नागरिकांनी दिली असून, काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविल्याचे त्यांनी सांगितले.
रस्ता अरुंद असल्याने टिप्पर आज जाणार नाही, अशी आपण सूचना केली हाेती. मात्र, घरमालकाने जबरदस्तीने टिप्पर आत आणायला लावला. घरमालकाच्या मुलाने बांबूने तारा वर करण्याचा प्रयत्न केला व तारांचे घर्षण झाले. त्यामुळे भडका उडून ठिणग्या पडल्या, अशी माहिती टिप्परचालक राजेंद्र चौधरी, रा. धापेवाडा, ता. कळमेश्वर याने दिली.
..
ही उपकरणे निकामी
या प्रकारामुळे ३५ टीव्ही, सहा रेफ्रिजेरेटर (फ्रिज), एक पाण्याचा माेटरपंप, एक एसी, १९ सिलिंग फॅन, तीन होम थिएटर, एक मोठा फ्रिजर, नऊ सेट टाॅप बाॅक्स, एक वॉटर फिल्टर, एक रेडिओ, एक मिक्सर आदी उपकरणे निकामी झाले असून, घरामधील २५० बल्ब फ्यूज झाले आहेत. शिवाय, तीन घरांमधील इलेक्ट्रिक फिटिंग पूर्णपणे जळाली.
...
जबाबदारी स्वीकारणार काेण
सुरेश कोल्हे यांच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकार घडला. महावितरण कंपनीने कार्यालय बाजारगाव येथेच आहे. त्यांनी याबाबत आधी सूचना दिली असती तर कर्मचारी पाठवून याेग्य उपाययाेजना करीत हा प्रकार टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया महावितरण कंपनीचे उपअभियंता श्रीवास्तव यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, जाेरात हवा वाहात असल्याने तारा वर उचलताच त्यांचे घर्षण झाले. तारा लाेंबकळल्या असल्याने त्या वर कराव्या लागल्याचे सुरेश काेल्हे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, या नुकसानीची जबाबदारी स्वीकारायला कुणीही तयार नाही.