खापा : महसूल व खनिकर्म विभागाच्या संयुक्त पथकाने खापा (ता. सावनेर) परिसरात केलेल्या कारवाईमध्ये ८७० ब्रास रेतीसाठा जप्त केला. ही रेती कुणाच्या मालकीच्या आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या रेतीची एकूण किंमत २१ लाख ७५ हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. ही कारवाई नुकतीच करण्यात आली.
खापा परिसरातील हनुमान घाट नजीकच्या शिवमंदिर शिवधामाला लागून असलेल्या शासकीय जागेवर रेतीचा साठा असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली हाेती. त्यामुळे महसून व खनिकर्म विभागाच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी या साठ्याची पाहणी केली. ताे अवैध असल्याचे लक्षात येताच त्यांनी संपूर्ण रेतीसाठा जप्त करीत ताे खापा शहरातील नवीन वस्तीतील गांधी शाळेजवळ असलेल्या माेकळ्या जागेवर हलविण्यात आला.
हा साठा ८७० ब्रास असल्याची माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली असून, त्याची किंमत मात्र सांगितली नाही. या रेतीसाठ्याची एकूण किंमत २१ लाख ७५ हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. ही कारवाई तहसीलदार दीपक करांडे यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी कनोजे, तलाठी चंद्रकांत कळणे, रामचंद्र लांबट यांच्या पथकाने केली. याबाबत खापा पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविण्यात आल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.
...
रेतीचा अवैध उपसा सुरूच
खापा शहरालगत कन्हान नदी वाहत असून, या नदीच्या पात्रातून रेतीचा अव्याहतपणे अवैध उपसा सुरूच आहे. रेतीचा अवैध उपसा काेण, कधी, कुठून व कसा करताे याबाबत महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना इत्थंभूत माहिती आहे. खापा पेठ हा रेतीघाट मागील काही वर्षांपासून बंद करण्यात आला असला तरी, त्यातून रेतीचा उपसा सुरूच आहे. जप्त करण्यात आलेली रेती खापा पेठ घाटातून उपसा केलेली असावी, अशी शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली आहे.