नागपूर : गेल्या १४ वर्षात राज्यभरातल आश्रमशाळांमधील ८७७ विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आश्रम शाळांची पाहणी करण्यासाठी दोन समित्या नेमण्यात आल्या होत्या. त्यांनी २००१ ते २०१४ या १४ वर्षांची परिस्थिती अभ्यासून दिलेल्या अहवालातून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.नांदेड जिल्ह्यातील कुपटी गावच्या आश्रमशाळेतील अंजली मेंढे या मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेने आश्रमशाळांमधील सुरक्षेचा व व्यवस्थेचा प्रश्न पून्हा ऐरणीवर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २०१४ साली एका याचिकेवर सुनावणी करताना टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या माध्यमातून समिती गठित केली होती. दुसरीकडे राज्यपालांनीही आश्रमशाळांच्या चौकशीसाठी डॉ. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. या दोन्ही समित्यांनी दिलेल्या अहवालानुसार आश्रमशाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत शिकणाºया ८७७ मुला-मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. म्हणजे दर वर्षाला ७० ते ७५ मुले आश्रमशाळांच्या अव्यवस्थेचे बळी ठरले. यापैकी ४५३ मुलांच्या पालकांना नुकसानभरपाई म्हणून मोबदला देण्यात आला आहे. अहवालामध्ये २०१५ पासूनची माहिती नमूद करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, ४५ टक्के प्रकरणांमध्ये आश्रमशाळा चालकांकडून मृत्युचे खरे कारण लपविले जात असल्याचे समितीला दिसून आले.
८७७ विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 4:07 AM