महेंद्र बुरुलेवार
केळवद (नागपूर) : कॉंग्रेसचे आ. सुनील केदार यांच्या सावनेर तालुक्यात ग्रा.पं.च्या निवडणुका हायव्होल्टेज होत आहेत. यातच केळवद ग्रा.पं.ची निवडणूक चर्चेत आली ती सरपंचपदाचे ८८ वर्षांचे अपक्ष उमेदवार यशवंत रामाजी विंचुरकर गुरुजी यांच्यामुळे! याशिवायत याच गावात सदस्यपदासाठी दोन सख्खे भाऊ एकमेकांविरोधात उभे आहेत.
७०४० मतदार असलेली केळवद ग्रा.पं. कॉंग्रेस आणि भाजपसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. येथे सरपंचासह १५ सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. ग्रा.पं.निवडणुकीसाठी अवघे ४ दिवस शिल्लक असल्याने गावात प्रचाराचा धुरळा उडाला आहे. येथे कॉंग्रेस आणि भाजप समर्थक पॅनलमध्ये सामना होताना दिसत आहे. गत तीन टर्म येथे सरपंचपद महिलांकडे होते. यावेळी सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गाकरिता राखीव असल्याने केळवदची निवडणूक हायव्होल्टेज होत आहे. यातच गावाच्या विकासाचा संकल्प करीत ८८ वर्षीय जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त शिक्षक यशवंत विंचुरकर सरपंचपदासाठी निवडणूक लढवीत असल्याने प्रस्थापितांसमोर आव्हान उभे झाले आहे. येथे काँग्रेस गटाकडून सुनील कामडी, भाजप गटाकडून एकनाथ दुधे, आम आदमी पार्टीकडून मोरेश्वर वाघमारे तर अपक्ष प्रफुल्ल खोंडे हेही सरपंचपदाचे उमेदवार आहेत. याशिवाय सदस्यपदांच्या १५ जागांसाठी ३१ उमेदवार रिंगणात आहेत.
दोन सख्या भावांत सामना
केळवदमध्ये प्रभाग क्रमांक ३ मध्ये सदस्यपदासाठी दोन सख्खे भाऊ आमने-सामने आले आहेत. यात काँग्रेस गटाकडून पिलाजी भय्याजी मदने तर भाजप गटाकडून वासुदेव भय्याजी मदने यांच्यात सामना होत आहे. दोन भावांत लढत होत असल्याने कोण मैदान मारणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.