प्रशिक्षण कार्यक्रम : कृषी व महसूल अधिकाऱ्यांचा समावेश नागपूर : यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाच्या उत्पन्नाचा अंदाज घेण्यासाठी तब्बल ९६२ पीक कापणी प्रयोग राबविण्यात येणार आहेत. यासाठी कृषी विभागाच्यावतीने अधिकाऱ्यांसाठी खास दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. गत २४ व २५ जुलैदरम्यान जिल्हा परिषदेच्या खेडकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यात पहिल्या दिवशीच्या प्रशिक्षणात जिल्ह्यातील महसूल मंडळ अधिकाऱ्यांसह मंडळ कृषी अधिकारी, पंचायत समितींचे कृषी अधिकारी व सांख्यिकी विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता. तसेच दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील उपविभागीय महसूल अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी संगीतराव होते. दरम्यान, कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे यांनी पॉवरपॉर्इंट प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून पीक कापणी प्रयोगाविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच राष्ट्रीय पीक विमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करण्याचे कृषी अधिकाऱ्यांना आवाहन करण्यात आले. कृषी उपसंचालक अजय राऊत यांनी पीक कापणी प्रयोगासाठी शेतकऱ्यांची निवड कशी करावी, पिकांचे प्लॉट कसे टाकावेत, पर्यवेक्षण करताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी तांत्रिक माहिती दिली. दुसऱ्या दिवशी प्रशिक्षणाचा समारोप झाला. यावेळी महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी राम जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी जिल्ह्यात एकूण ९६२ पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली. यानुसार महसूल, कृषी विभाग व जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने पीक कापणी प्रयोग राबवून त्याचा रिपोर्ट शासनाकडे सादर करावा, असे त्यांनी यावेळी आवाहन केले. (प्रतिनिधी)
९६२ पीक कापणी प्रयोग
By admin | Published: July 29, 2014 12:51 AM