नागपूर/बाजारगाव : सोलार एक्सप्लोसिव कंपनी चाकडोह ( जि. नागपूर ) येथे रविवारी सकाळी 9 वाजता झालेल्या स्फोटात 6 महिला व 3 पुरुषांसह एकूण 9 कामगारांचा मृत्यू झाला, सुदैवाने तीन लोक बचावले. या घटनेनंतर कंपनीतील कामगार व त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असून मोठा आक्रोश सुरू आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. तसेच, कंपनी परिसर सील करण्यात आला असून कोणालाही आतमध्ये सोडले जात नाही.
कोंढाळी-नागपूर मार्गावर कोंढाळी पासून 10 कि.मी अंतरावरील सोलार एक्सप्लोसिव कंपनीत रविवारी सकाळी 9 वाजता सीबीएच 2 या ईमारतीत स्फोट झाला. सकाळी 6 ते दुपारी 2 वाजताच्या टीएनटी,आरडीएक्स, एचएमटी पॅकिंगचे काम सुरू असताना सकाळी 9 वाजता एक भीषण स्फोट झाला. या स्फोटात 6 महिला व 3 पुरुषांसह एकूण 9 कामगारांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळ संपूर्ण सील करण्यात आले आहे. जोपर्यंत घटनास्थळ सुरक्षित असल्याचा अहवाल येत नाही, तोपर्यंत मृतदेह बाहेर काढता येणार नाही. NDRF सह इतर टीम घटानास्थळी पोहचत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात येतील. दरम्यान, कंपनीतील कामगार आक्रमक झाले असून मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स तैनात करण्यात आली आहे.
मृताची नावे अशी -
1) युवराज किसनाजी चारोडे बाजारगाव2) ओमेश्वर किसनलल मछिर्के चाकडोह, ता. नागपूर 3) मिता प्रमोद उईके अंबाडा सोनक ता. काटोल, जि. नागपूर 4)आरती निळकंठा सहारे ता. कामठी, जि. नागपूर 5) श्वेताली दामोदर मारबते कन्नमवार जि. वर्धा6) पुष्पा श्रीरामजी मानापुरे शिराला जि. अमरावती7) भाग्यश्री सुधाकर लोनारे भुज, ब्रम्हपुरी8) रुमीता विलास उईकेढगा जि. वर्धा9) मोसम राजकुमार पटले पांचगाव जि.भंडारा.
फडणवीसांकडून शोक व्यक्त
सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे. नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः IG, SP, जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मान्यता दिली आहे.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री